केजरीवाल यांची अवघ्या दहा वर्षात कमाल; आता आम आदमी पार्टीही राष्ट्रीय पक्ष होणार
राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. त्यापैकी कोणतीही एक अट पूर्ण करणे गरजेची आहे. एक म्हणजे राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी चार खासदार असावेत.
नवी दिल्ली: आम आदमी पार्टीने भलेही गुजरातमध्ये सत्ता मिळवली नसेल किंवा आम आदमी पार्टीला हिमाचलमध्ये खातंही खोलता आलं नसेल. पण आम आदमी पार्टीला दिलासा देणारी घटना या निवडणुकीतून घडली आहे. गुजरातमध्ये आपने 14 टक्के मते मिळवली आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टील राष्ट्रीय पक्ष बनला आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीत उत्साहाचं वातावरण आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत पोस्टर लावून आपला आनंद व्यक्त केला आहे.
आम आदमी पार्टीला हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. गुजरातमध्ये सत्तेत येण्याचं आपचं स्वप्नही भंगलं आहे. मात्र, आपने गुजरातमध्ये सहा जागांवर आघाडी घेतली आहे. त्याशिवाय आपला गुजरात विधानसभा निवडणुकीत 14 टक्के मते घेतल्याने आपचा राष्ट्रीय पार्टी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्या आधीच आम आदमी पार्टीने दिल्लीत पोस्टर लावले आहेत. राष्ट्रीय पक्ष झाल्याबद्दल जनतेचे आभार मानणारे पोस्टर्स दिल्लीत झळकावण्यात आले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी लागणारी मते गुजरात विधानसभा निवडणुकीत मिळतील हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कसं कळलं? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
दहा वर्षापूर्वी म्हणजे 2002मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली होती. या दहा वर्षात आपने दिल्लीसह पंजाबमध्ये सत्ता काबीज केली. तसेच दिल्ली महापालिकाही जिंकली. गोव्यातही चांगली कामगिरी केली. त्यानंतर आता गुजरातमध्येही मते खेचून आणली. त्यामुळे आप अवघ्या दहा वर्षातच राष्ट्रीय पक्ष बनला आहे.
राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. त्यापैकी कोणतीही एक अट पूर्ण करणे गरजेची आहे. एक म्हणजे राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी चार खासदार असावेत. तसेच 6 टक्के मते मिळवलेली असावीत. त्याशिवाय विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्यात एकूण सहा टक्के मते मिळवलेली असावीत.
दिल्ली आणि पंजाबमध्ये आपचे बहुमताचे सरकार आहे. गोव्यात आपला 6.77 टक्के मते मिळालेली असून त्यांनी दोन जागांवर विजयही मिळवला आहे. त्याशिवाय इतर राज्यातही आपची थोडी बहुत व्होट बँक आहे. मात्र, गुजरात निवडणुकीत आपने 14 टक्के मते मिळवल्याने आप राष्ट्रीय पक्ष बनला आहे.