घर खरेदीदारांना रेराची खूशखबर; बुकिंग रद्द केल्यास एवढीच रक्कम कपात होणार
रेराच्या नव्या निर्णयानुसार फ्लॅट बुकिंग रद्द केल्यास बिल्डर यापुढे घर खरेदीदारांकडून जास्त रक्कम घेऊ शकणार नाही. रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीने (रेरा) सर्व बांधकाम व्यावसायिकांना यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
मुंबई : घर खरेदीदारांसाठी रेरा (RERA)ने मोठी खुशखबर दिली आहे. यापूर्वी फ्लॅटचे बुकिंग रद्द केल्यास मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागत होते. ते नुकसान आता टाळणार आहे. जर तुम्ही घर खरेदीचे प्लॅनिंग केलेय आणि आयत्यावेळी कोणत्याही समस्येमुळे घराचे बुकिंग रद्द करावे लागले, तर चिंता करू नका. याचा मोठा आर्थिक फटका आता बसणार नाही. रेराच्या नव्या निर्णयानुसार फ्लॅट बुकिंग रद्द (Cancel) केल्यास बिल्डर यापुढे घर खरेदीदारांकडून जास्त रक्कम घेऊ शकणार नाही. रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीने (रेरा) सर्व बांधकाम व्यावसायिकांना यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या निर्णयाने घर खरेदीदारांना मोठा दिलासा (Big Relief) दिला आहे.
महाराष्ट्र रेराच्या नव्या निर्णयानुसार, आता घरांचे बुकिंग रद्द केल्यावर खरेदीदाराला एकूण किमतीच्या फक्त 2 टक्के रक्कम बिल्डरला द्यावी लागेल. आतापर्यंत ही रक्कम 10 टक्के होती. कल्पतरू अवाना या लक्झरी रिअल इस्टेट प्रकल्पाच्या विकासकांच्या बाबतीत रेराने नुकताच एक आदेश दिला आहे. त्या आदेशात म्हटले आहे की, घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील करारामध्ये अचानक बुकिंग रद्द करावे लागले, तर याबाबतीत विकासकाकडून 10 टक्के रक्कम आकारणे पूर्णपणे अवास्तव आहे.
प्रकल्पाच्या दिरंगाईनंतर सुरु झाला होता वाद
घर खरेदीदारांनी ऑगस्ट 2020 मध्ये महाराष्ट्र रेरामध्ये तक्रार केली होती. खरेदीदारांनी त्यांच्या फ्लॅट बुकिंगचे पैसे व्याजासह परत करण्याची मागणी केली होती. खरेदीदारांनी सांगितले की त्यांनी कोणत्याही विक्री आणि खरेदी दस्तऐवजांवर स्वाक्षरी केलेली नाही. 2015 मध्ये केवळ एका एलओआयवर स्वाक्षरी केली होती, जे एक वाटपपत्र होते. त्या पत्रात फ्लॅट मिळण्याच्या तारखेचा कुठेही उल्लेख नव्हता, मात्र त्यासाठी 3 वर्षांचा कालावधी पुरेसा असल्याचे सांगण्यात आले होते.
घर खरेदीदारांनी जुलै 2020 मध्येच प्राधिकरणाला कळवले होते की त्यांना या प्रकल्पात रस नाही. तसेच त्यांनी त्यावेळी प्रकल्पातून माघार घेऊ इच्छित असल्याचे स्पष्ट केले होते. यासोबतच विकासकाला दिलेले पैसे त्यांनी व्याजासह परत मागितले होते. मात्र, याचदरम्यान विकासकाला ऑक्टोबर 2021 मध्ये या सदनिकांचे भोगवटा प्रमाणपत्र मिळाले.
विकासकानेही केल्या होत्या अनेक तक्रारी
भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कल्पतरू डेव्हलपर्सने अनेक तक्रारी केल्या. तथापि, रेराने विकासकाचा युक्तिवाद स्वीकारला नाही. घर खरेदीदारांनी त्यांचे बुकिंग रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. ग्राहकांच्या तक्रारीनंतर विकासकाने त्यांच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. अशा परिस्थितीत घर खरेदीदारांना प्रकल्पात राहण्याची सक्ती करता येणार नाही. विकासक घराच्या एकूण किंमतीपैकी फक्त 2% रक्कम बुकिंगच्या रक्कमेतून वजा करू शकतात, असा निर्णय रेराने दिला आहे.