आधी 10 किलो मटन द्या, मग अंत्यसंस्कार…महिलेचा मृतदेह पडून, नेमक प्रकरण काय?
एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी 10 किलो मटन द्या, मग अंत्यसंस्कार अशी अजब मागणी करण्यात आली. हे नेमक प्रकरण काय?
मयूरभंज : सामूहिक भोजनाची व्यवस्था केली नाही, म्हणून दोन दिवस एका वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. 10 किलो मटनाच्या मागणीमुळे तिचा मृतदेह घरातच पडून होता. सामूहिक भोजन दिल नाही, म्हणून गावकऱ्यांनी अंत्यविधीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. मृत महिलेच्या मुलाने मटनाची व्यवस्था केल्यानंतर अंत्यसंस्कार झाले. मानवतेला लाज आणणारी ही घटना ओदिशा मयूरभंजची आहे.
गावात अंत्यसंस्काराच्यावेळी सामूहिक भोजन देण्याची प्रथा आहे. मृत महिलेच्या मुलाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे तो गावकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करु शकला नाही. म्हणून गावकऱ्यांनी अत्यंसंस्कारात सहभागी होण्यास नकार दिला. त्यांनी मुलासमोर 10 किलो मटनाची अट ठेवली. या मटनाची व्यवस्था करण्यासाठी त्याला दोन दिवस लागले. दोन दिवसानंतर त्याच्या आईवर अंत्यसंस्कार झाले. या दरम्यान दोन दिवस महिलेचा मृतदेह घरात पडून होता.
गावची प्रथा काय?
मयूरभंज तेलाबिलाच हे प्रकरण आहे. या गावात राहणाऱ्या 70 वर्षीय सोम्बारी सिंह या महिलेच निधन झालं. गावात विवाह आणि मृत्यूच्यावेळी सामूहिक भोजन देण्याची प्रथा आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांची गावासाठी भोजन आयोजित करण्याची आर्थिक स्थिती नव्हती. गावकऱ्यांची 10 किलो मटनाची मागणी पूर्ण करण्यासाठी ते असमर्थ होते. म्हणून ग्रामीणांनी अंत्यसंस्कारात सहभागी होण्यास नकार दिला.
गावकऱ्यांच म्हणण काय?
गावकऱ्यांच म्हणण असं आहे की, सोम्बारी कुटुंबात याआधी दोन लग्न झाली. त्यावेळी भोजनाची व्यवस्था केली नव्हती. गावकऱ्यांच्या मनात याचा राग होता. शनिवारी सोम्बारीच निधन झालं. गावात मृत्यू झाल्यानंतर सामूहिक भोजन देण्याची परंपरा आहे. याआधी दोन मंगल कार्याच्यावेळी जेवण दिलं नाही, म्हणून गावकऱ्यांनी 10 किलो मटनाची मागणी केली.