हेमा मालिनी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, काँग्रेस नेत्यावर निवडणूक आयोगाची कारवाई
काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते सुरजेवाला यांनी हेमा मालिनी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावत उत्तर मागितले होते. त्यानंतर आता आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे.
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 आधी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांना निवडणूक आयोगाने मोठा झटका दिला आहे. मंगळवारी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) त्याच्या निवडणूक प्रचारावर बंदी घातलीये. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार हेमा मालिनी यांच्याबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. निवडणूक आयोगाने रणदीप सुरजेवाला यांच्यावर प्रचार आणि कोणत्याही प्रकारची मीडिया मुलाखत देण्यास ४८ तासांची बंदी घातली आहे.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, “भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२४ अन्वये आणि त्यासाठी सक्षम असलेल्या इतर सर्व अधिकारांनुसार, निवडणूक आयोगाने त्यांना (रणदीप सुरजेवाला) पुढील ४८ तासांसाठी कोणत्याही सार्वजनिक सभा, सार्वजनिक सभेला उपस्थित राहण्यास त्यांना मनाई केली आहे. 16 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता.” मिरवणुका, सार्वजनिक रॅली, रोड-शो आणि मुलाखती, प्रसारमाध्यमांमधील सार्वजनिक भाषणे (प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया) प्रतिबंधित केले आहे.”
भाजपने केली होती तक्रार
काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी हेमा मालिनी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने यानंतर रणदीप सुरजेवाला यांना नोटीस बजावली होती आणि उत्तर मागितले होते. एप्रिल 2024 च्या सुरुवातीला पाठवलेल्या या कारणे दाखवा नोटीसमध्ये निवडणूक आयोगाने भाजप खासदाराविरुद्ध केलेल्या त्यांच्या वक्तव्याला “अभद्र, अश्लील आणि असभ्य” असे म्हटले होते. मात्र, रणदीप सुरजेवाला यांनी उत्तर दिले होते की, ज्या व्हिडिओबाबत तक्रार करण्यात आली आहे त्या व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आली आहे.
मथुरा लोकसभेतून उमेदवार
मुळच्या तामिळनाडूच्या बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी या आता 75 वर्षांच्या आहेत. त्यांनी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर राजकारणाकडे वळाल्या. ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाजपच्या हेमा मालिनी या दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. हेमा मालिनी यांनी या सार्वत्रिक निवडणुकीत मथुरा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे.