काश्मीरमधील दहशतवाद बंदुकीने नव्हे तर…ओमर अब्दुल्लांचं विधिमंडळात मोठं विधान!
या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचे विशेष सत्र आयोजित केले होते. या अधिवेशनाचे कामकाज चालू झाल्यानंतर सभागृहात पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाममधील हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. या हल्ल्यातील गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचे विशेष सत्र आयोजित केले होते. या अधिवेशनाचे कामकाज चालू झाल्यानंतर सभागृहात पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
बंदुकीच्या मदतीने फक्त …
ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याबाबत जम्मू काश्मीर सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी बंदुकीच्या माध्यमातून दहशतवादावर फक्त नियंत्रण मिळवता येईल. पण तो संपवला जाऊ शकत नाही. लोक जेव्हा आपल्यासोबत असतील, तेव्हाच तो संपुष्टात येईल. आज लोक आपल्यासोबत असल्याचे मला वाटत आहे, अशी प्रतिक्रिया ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.
तब्बल 21 वर्षांनी अशा प्रकारचा हल्ला…
अब्दुल्ला यांनी आपल्या भाषणात पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या 26 जणांची नावे घेतली. या हल्ल्याची झळ पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत यासह अरुणाचल प्रदेशापासून गुजरातपर्यंत तसेच जम्मू काश्मीरपासून, केरळ यासारख्या राज्यांना बसली आहे. जम्मू काश्मीरमधील हा काही पहिलाच हल्ला नाही. मात्र मध्यंतरी हे हल्ले बंद झालेले होते. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी असा प्रकारचा मोठा हल्ला जम्मू काश्मीरमध्ये झालेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
माफी मागू की काय करू?
आम्ही 26 लोकांना श्रद्धांजली अर्पण केली. माझ्याकडे शब्द नाहीत. मी त्यांच्या कुटंबीयांची माफी मागू की काय करू हे समजत नाही? कारण जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी ही इथल्या सरकारची नाही. ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे, असे मतही अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.
जम्मू काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी…
या हल्ल्यात तेथील स्थानिक रहिवासी असलेला आदील नावाचा तरुण मृत्युमुखी पडला. यावरही अब्दुल्ला यांनी भाष्य केलं. आदिलने आपल्या जीवाची बाजी लावून पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जम्मू काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी ही इथं निवडून आलेल्यास सरकारची नाही. सध्याच्या घटनेचा फायदा घेऊन मी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी करणार नाही. कारण ही योग्य वेळ नाही. आम्ही या दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करते. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत, असे आश्वासनही ओमर अब्दुल्ला यांनी दिले.