मस्तच! महागाईत स्वस्ताई, सिलिंडरचे भाव घटले, पण…; मुंबईतील भाव काय?
कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किंमती जाहीर करतात. सध्या जगात नॅचरल गॅसच्या किंमती वाढताना दिसत आहेत.
नवी दिल्ली: एकीकडे महागाईचा आगडोंब उसळलेला असतानाच देशातील जनतेला त्यातून थोडा दिलासा देणारी बातमी आहे. सण उत्सवाच्या काळात गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किंमतीत घट करण्यात आली आहे. मात्र, ही घट केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी (commercial lpg cylinder price) देण्यात आली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून 19 किलोवाला प्रत्येक कमर्शियल गॅस सिलिंडर 25.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. कोलताकात्यात त्याचे भाव 36.5 रुपयांनी, मुंबईत (mumbai) 32.5 रुपयांनी आणि चेन्नईत 35.5 रुपयांनी कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत कमी झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या दरांचा आढावा घेतला जातो. त्यानुसार हा आढावा घेऊन दर कमी करण्यात आले आहेत. नवे दर तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत.
आज कमर्शियल गॅस सिलिंडरचे भाव घटल्यानंतर दिल्लीत इंडेनचा 19 किलोवाला सिलिंडर 1859.5 रुपयात मिळणार आहे. या सिलिंडरची किंमत आधी 1885 रुपये होती. तर कोलकात्यात आता हा सिलिंडर 1959 रुपयांना मिळणार आहे. आधी त्याची किंमत 1995.5 रुपये होती.
मुंबईत कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 1811.5 रुपये झाली आहे. आधी मुंबईत हा सिलिंडर 1844 रुपयांना मिळत होता. चेन्नईत या सिलिंडरची किंमत 2045 रुपयांवरून 2009.5 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये सिलिंडरच्या किंमतीत 91.5 रुपयाने घटले होते. आता ऑक्टोबरच्या पहिल्याच तारखेला ही घट करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यापासून कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे.
कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किंमती जाहीर करतात. सध्या जगात नॅचरल गॅसच्या किंमती वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी नॅचरल गॅसच्या किंमतीत 40 टक्क्याने वाढ झाली. ही एक विक्रमी वाढ आहे. नॅचरल गॅसच्या दरात वाढ झाल्याने सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.