महाराष्ट्रात कांदा घसरला, पण नेपाळमध्ये 200 तर श्रीलंकेत 300 रुपये किलोवर
Onion Rate | केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर कांद्याचे दर घसरत आहे. बाजारात दहा दिवसांपूर्वी चार हजारात विकला जाणारा कांदा गेल्या दहा दिवसांत दोन हजाराच्या खाली आला आहे. परंतु भारताच्या शेजारील देशांत कांद्याचे दर दुप्पट झाले आहे.
उमेश पारीक, लासलगाव, नाशिक, 16 डिसेंबर | कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने गेल्या आठवड्यात कांद्याची निर्यात बंदी करण्यात आली. त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सरासरी बाजार भाव दोन हजार रुपयांच्या आत आले आहे. येवला बाजार समितीत कांद्याला पंधराशे रुपये सरासरी बाजार भाव जरी मिळत असेल तरी बाराशे ते तेराशे रुपये कांद्याची खरेदी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरण असताना निर्यात बंदीचा फटका अनेक देशांना बसला आहे. नेपाळमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो 200 तर श्रीलंकेत 300 रुपये किलोवर गेले आहे.
कोणत्या देशांत काय झाला परिणाम
भारतात कांदा निर्यात बंदीचा फटका अनेक देशांना बसला आहे. एकीकडे भारतात कांद्याचे दर घसरत असताना इतर देशांमध्ये कांद्याचे दर वाढत आहे. गेल्या दहा दिवसांत नेपाळमध्ये कांद्याचे दर दुप्पट झाले आहे. दहा दिवसांपूर्वी नेपाळमध्ये शंभर रुपये प्रतिकिलो मिळणार कांदा आता दोनशे रुपये किलोंवर गेला आहे. नेपाळने मागील आर्थिक वर्षांत 6.75 अब्ज रुपयांचा 190 टन कांदा आयत केला होता. नोव्हेंबर 2019 मध्ये भारताने कांदा निर्यात बंदी करताच किंमत 250 रुपये प्रती किलोवर गेली आहे.
श्रीलंकेत कांदा 300 रुपये प्रति किलो
श्रीलंकेत भारताच्या निर्यात बंदीचा परिणाम कांद्यावर झाला आहे. कांद्याची किंमत 300 रुपये प्रती किलोवर गेली आहे. मालदीवसुद्धा कांद्याबाबत भारतावर अवलंबून आहे. मालदीवमध्ये 200 ते 350 रूफीया प्रती पॅकेट कांदा विकला जात होतो. तो भारताने कांदा निर्यात बंदी करताच 500 रूफीया पॅकेटपासून 900 रूफीया पॅकेटपर्यंत गेला आहे. भूतानमध्ये 50 नगुल्ट्रम प्रती किलो कांदा विकला जात होता. भारताच्या निर्णयानंतर आता हा दर 150 नगुल्ट्रम प्रति किलोवर गेला आहे. बांगला देशात कांदा 200 प्रती किलोटकावर गेला आहे. हा कांदा पूर्वी 130 टका प्रती किलोवर होता.