‘फक्त पंतप्रधान मोदीच युद्ध थांबवू शकतात’, झेलेन्स्की यांनी सांगितले युक्रेनचा भारतावर विश्वास का?
भारताने रशिया आणि युक्रेन युद्धात कोणाला ही पाठिंबा दिलेला नाही. दोन्ही देशांमध्ये अजूनही युद्ध सुरु आहे. पण भारताने दोन्ही देशांना आतापर्यंत चर्चेतून मार्ग काढावा असंच आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांना युद्धाच्या काळात भेट दिली आहे. त्यातच आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं पुन्हा एकदा नवं वक्तव्य समोर आले आहे.
रशिया-युक्रेन युद्धाला अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण अजूनही यातून मार्ग निघत नाहीये. आतापर्यंत या युद्धात हजारो लोकांना आपले जीव गमवावा लागला आहे. पण तरीही युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांना सातत्याने शांततेचे आवाहन करत चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन केले आहे. या दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr zelenskyy Praise PM Modi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींबाबत मोठं वक्तव्य केलंय. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यात पंतप्रधान मोदी मोठी भूमिका बजावू शकतात, असा विश्वास युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केलाय. झेलेन्स्की म्हणाले की, पीएम मोदी युद्ध थांबवू शकतात यात शंका नाही.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले की, पीएम मोदींचे प्रयत्न खरोखर युद्ध थांबवू शकतात. हे युद्ध संपवण्यासाठी पंतप्रधान मोदींना खूप महत्त्व आहे. पंतप्रधान हे जगातील एकमेव राजकारणी आहेत ज्यांनी युद्धाच्या काळात रशिया आणि युक्रेनला भेट दिली.
काही दिवसांत युक्रेन आणि रशियामध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे. त्यामुळे हिवाळ्यात युद्ध लढणे हे मोठे आव्हान असणार आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी याबाबत चिंता व्यक्त केलीये. ते म्हणाले की, युक्रेन आणि युक्रेनियन लोकांसाठी हा तिसरा कठीण हिवाळा आहे. आम्ही आमची ऊर्जा प्रणाली टप्प्याटप्प्याने मजबूत करत आहोत. आम्ही रशियन सैन्याला चोख प्रत्युत्तर देऊ.
पीएम मोदींची पुतिन यांच्यासोबत चर्चा
पंतप्रधान मोदी यांनी ब्रिक्स परिषदेत पुतिन यांची भेट घेतली होती. भारत आणि रशिया यांच्यात द्विपक्षीय बैठक देखील झाली होती. या बैठकीत पीएम मोदींनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासमोर रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख केला. पीएम मोदी म्हणाले की, भारत नेहमीच शांततेचा पुरस्कार करत आला आहे. युद्ध हे शांततेनेच सोडवले जाऊ शकते. पण पीएम मोदींच्या या वक्तव्यावर झेलेन्स्की यांनी जोरदार टीका केली होती.
झेलेन्स्की म्हणाले की, ‘शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही काम करण्यास तयार आहोत हे भारताचे विधान पुरेसे नाही. भारताची कृतीही पाहिली पाहिजे. पीएम मोदी हे एका मोठ्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे असा देश फक्त असे म्हणू शकत नाही की, आम्हाला युद्ध संपवण्यात रस आहे. पीएम मोदी हे युद्ध संपवण्यात मोठी भूमिका बजावू शकतात.’