संघाच्या नेत्याच्या वादग्रस्त विधानाने गोव्यातील राजकारण तापलं; थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीच मागणी
कोणत्या ना कोणत्या राजकीय कारणाने गोव्यातील राजकारण नेहमीच तापलेलं असतं. सध्या संघाच्या एका नेत्याच्या विधानामुळे गोव्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या नेत्याने ख्रिश्चन समुदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याने गोव्यात जोरदार आंदोलने होत आहेत. विरोधी पक्षांनीही आक्रमक भूमिका घेत थेट सरकारवरच हल्लाबोल केला आहे.
गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राज्य यूनिट प्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्या कथित विधानामुळे गोव्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. वेलिंगकर यांनी आक्षेपहार्य विधान केलं होतं. त्यामुळे संपूर्ण गोव्यात जोरदार आंदोलन करण्यात आलं. या विधानानंतर वेलिंगकर फरार झाले आहेत. चर्चच्या आवाहनानंतर गोव्यातील आंदोलन थांबलं असलं तरी राज्यातील विरोधी पक्ष आता आक्रमक झाला आहे. विरोधकांनी थेट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचाच राजीनामा मागितला आहे.
सुभाष वेलिंगकर यांच्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजप जाणूनबुजून गोव्यात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. संघाच्या नेत्यांनी ख्रिश्चनांना भडकवण्याचं काम केलं आहे. तसेच संघाच्या संघटनांनी मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. भाजप लोकांमध्ये फूट पाडत आहे. भाजपचं हे षडयंत्र देशातील नागरिक हाणून पाडतील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर गोवा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी राज्यपालांना या धार्मिक तणावाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. यावेळी कवठणकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निष्क्रियतेचा आणि दुफळी निर्माण करण्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच फॉरेस्ट जमिनीच्या प्रकरणाचं उत्तर दायित्व म्हणूनही सावंत यांनी पायउतार झालं पाहिजे, असं कवठणकर यांनी म्हटलं आहे.
सामाजिक वातावरणाला धोका
सुनील कवठणकर यांनी राज्यपालांना एक पत्र लिहिलं आहे. वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने धार्मिक तणाव निर्माण झाल्याबद्दल प्रचंड चिंता व्यक्त केली आहे. सरकारच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती खराब झाली आहे. त्यामुळे व्यापक आंदोलनेही झाले आहेत. गोव्यातील सामाजिक वातावरणाला धोका निर्माण झाला आहे. जंगल तोड आणि भूटानी सारख्या बड्या प्रकल्पांसाठी खाजगी वनभूमीच्या पुनर्वर्गीकरणाशी संबंधित वादातून ही सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे. लोकांनी त्याला कडाडून विरोध केला आहे, असं कवठणकर यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. तसेच पर्यावरणाच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच धार्मिक तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोपही कवठणकर यांनी भाजपर केला आहे.
अटकेच्या मागणीचा जोर
भडकाऊ भाषण केल्यामुळे लोकांच्या विरोधाला सामोरे जावं लागलेल्या वेलिंगकरांना कोर्टाने नुकताच जामीन नाकारला आहे. त्यांच्या विधानामुळे संपूर्ण गोव्यात आक्रोश निर्माण झाला आहे. केवळ राज्यातच नव्हे तर जगात राहणाऱ्या गोव्यातील नागरिकांनीही आंदोलने केली आहेत. लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या शहरांमध्ये निदर्शने झाल्याची बातमी आली आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. या आंदोलनामध्ये टीएमसी आणि काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भाग घेतला आहे. या नेत्यांनी धार्मिक भावना भडकावल्याबद्दल वेलिंगकर यांच्या अटकेची आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आपच्या नेत्याचा हल्लाबोल
आपचे राज्यप्रमुख अमित पालेकर आणि अन्य विरोधी पक्षांनी सीएम सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. वेलिंगकर यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करतानाच पालेकर यांनी मुख्यमंत्री सावंत यांचाही निषेध नोंदवला आहे. माजी पर्यावरण मंत्री अलीना सलदान्हा यांनीही धार्मिक सद्भावाच्या तुलनेत वादग्रस्त भूमी पुनर्वर्गीकरणाला सरकार प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आहे.