ब्लॅक ड्रेस प्रोटेस्ट, कामकाज सुरू होताच काँग्रेसचा संसदेत प्रचंड गदारोळ; दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्याचे पडसाद आज संसदेत उमटले. काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांनी काळे कपडे घालून या घटनेचा निषेध नोंदवला.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेसने देशभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू केली आहेत. काल राजघाटावर आंदोलन केल्यानंतर आज काँग्रेसने काळे कपडे घालून सरकारचा निषेध नोंदवला. काँग्रेसचे सर्व खासदार आज काळे कपडे घालून संसदेत आले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरू होताच काँग्रेसने राहुल गांधी यांच्या खासदारकीचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. तर दुसरीकडे काँग्रेससाठी दिलासादायक बाब म्हणजे काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील दुरावा कमी झाला आहे.
राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज सुरू होताच अदानी आणि राहुल गांधी यांच्या मुद्द्यावर प्रचंड गोंधळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज दुपारी 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
सर्व खासदार काळ्या कपड्यात
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर विरोधक एकवटले आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासहीत विरोधी पक्षाचे सर्वच खासदार आज संसदेत काळे कपडे घालून आले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे खासदार काळे कपडे घालून आले होते. दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच या सदस्यांनी एकच गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं.
या पक्षांची उपस्थिती
त्यापूर्वी विरोधी पक्षांची बैठक झाली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला काँग्रेस, डीएमके, समाजवादी पार्टी, जेडीयू, बीआरएस, सीपीएम, आरजेडी, एनसीपी, सीपीआय, टीएमसी, आययूएमएल, केसी, एमडीएमके, आरएसपी, आप, जम्मू काश्मीर एनसी, शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) आदी पक्षाचे खासदार उपस्थित होते. मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात ही बैठक झाली. या बैठकीला सोनिया गांधीही उपस्थित होत्या. या बैठकीला आलेले अनेक नेते काळे कपडे घालून आले होते. विशेष म्हणजे आम आदमी पार्टी आणि टीमएसीचे खासदार या बैठकीला उपस्थित राहिल्याने काँग्रेससाठी ही समाधानाची बाब असल्याचं सांगितलं जात आहे.