Pahalgam Terrorist Attack : देशाला वाचवायचे तर… सद्गुरू जग्गी वासुदेव यांची पहलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी प्रतिक्रिया
Sadguru Jaggi Vasudev : ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी पहेलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांविषयी तीव्र शोक व्यक्त केला. त्याचवेळी त्यांनी मोठा संदेश दिला आहे. त्यांच्या प्रतिक्रियेची सध्या समाज माध्यमावर चर्चा सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केला. त्यांनी या हल्ल्याविषयी मोठे आवाहन केले. त्याची सध्या चर्चा होत आहे. काल पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांनी जीव गमवावा लागला. ६ दहशतवादांनी हे भ्याड कृत्य केल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानातील रावळपिंडीशी या हल्ल्याचे कनेक्शन उघड झाले आहे.
ते तर समाजाला तोडू पाहतायेत
दहशतवाद्यांचा उद्देशच समाजाला तोडण्याचा आहे. ते समाजाला पंगू करू इच्छितात. ते नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाच्या विकासाला खिळ बसवण्याचा आणि आर्थिक स्थिती कमकुवत करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. जर आपल्याला देश अखंड ठेवायचा असेल तर दहशतवादाचा सक्तीने निपटारा करा, त्यांचा कठोरपणे सामना करा असे आवाहन सद्गुरू यांनी केले.




धार्मिक दहशतवाद धोकादायक
धार्मिक दहशतवाद हा धोकादायक आहे. कारण धर्मवेड्यांना समजावून सांगणे कठीण असते. त्यांच्या नसा नसात दहशतवाद भिनलेला असतो. ते धर्म आणि त्यांच्या देवासाठी स्वत: मरायला तयार असतात. त्याना तार्किक आधारावर समजावून सांगणे अवघड असल्याचे सद्गुरु म्हणाले.
आमच्या पूर्वजांनी गरिबी आणि उपासमारीचा सामना केला. त्यामुळे आपण आता आर्थिकदृष्ट्या देशाला मजबूत करावे. सध्याची वेळ ही देशाच्या शत्रूंशी एकत्रितपणे सामना करण्याची आहे. जे लोक स्त्रीया, मुलं आणि देशातील नागरिकांविरोधात बॉम्ब, शस्त्रांचा वापर करतात, त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी सद्गुरूंनी केली.
भेद विसरून सर्वांनी एकत्र यावे
धर्म, जाती, पंथ वा राजकीय विरोधक असो, सर्वांनी एकत्र येऊन एक राष्ट्र म्हणून अशा शक्तींच्या विरोधात उभं राहावं असं आवाहन त्यांनी केले. आपण सर्वांनी सुरक्षा दलांना सहकार्य करावे. दहशतवादाविरोधात भारताने दीर्घकालीन उपायांवर जोर द्यावा असे ते म्हणाले. शिक्षण, आर्थिक संधी, रोजगार यासह इतर माध्यमातून आर्थिक विकास साधून अशा देशविघातक शक्तींशी सामना करण्याचे आवाहन सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी केले.