NIA ने सुरू केला पहलगाम हल्ल्याचा तपास; स्लीपर सेलची बाहेर काढणार कुंडली, काय लागले हाती?
Pahalgam Terrorist Attack NIA : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) हाती घेतला आहे. दहशतवाद्यांचे नेटवर्क, स्थानिकांची मदत आणि संभाव्य स्लीपर सेल्सचा तपास एनआयए करत आहे. एनआयए घटनास्थळी जाऊन तपास करत आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) हाती घेतला आहे. दहशतवाद्यांनी पहलगाम येथील बैसरन मैदानात पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. तर इतर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. 22 एप्रिल रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात NIA ने तपासाला सुरुवात केली आहे. घटनेविषयी उपस्थित असलेल्या स्थानिकांकडून माहिती घेण्यात येत आहे. तर दुकानदारांची चौकशी करण्यात येत आहे.
NIA ची टीम दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाम येथे दाखल झाली आहे. तिने घटनास्थळी कसून तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीम सु्द्धा घटनास्थळी दाखल झाली आहे. या मैदानवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गाचा बारकाईने तपास करण्यात येत आहे. एनआयए या हल्ल्याचे दहशतवादी कनेक्शन, त्यांची पद्धत, त्यांना स्थानिकातून कोणी मदत केली, संभाव्य स्लीपर सेल्स यांची कुंडली बाहेर काढणार आहे.
प्रत्यक्षदर्शींकडून घेणार माहिती




पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांना टार्गेट केले होते. या दरम्यान स्थानिकांनी अनेक लोकांना बाहेर काढण्यात मदत केली होती. ज्यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली, त्या स्थानिक दुकानदार, घोडे पुरवणारे, हॉटेल मालक यांच्याकडून या घटनेची माहिती घेण्यात येत आहे. एनआयएचे आयजी आणि डिआयजी, एसपी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते स्थानिकांकडून माहिती घेत आहेत. या माहितीच्या आधारे दहशतवाद्यांची कुंडली बाहेर काढण्यात येईल.
पहलगाम अजूनही पूर्वपदावर नाही
22 एप्रिल रोजी हल्ला झाल्यानंतर पहलगामकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. रविवारच्या दिवशीही पहलगाम मार्केट बंदच आहे. पर्यटकच नसल्याने अनेक व्यवसायिकांनी दुकानं बंद ठेवली आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाम अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. मुख्य बाजारपेठेत फक्त काही दुकानच उघडली गेली आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामचं आर्थिक गणित बिघडलं आहे. आता पर्यटकांनी लवकर पहलगाम येथे यावे अशी विनंती स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पहलगाम येथे सुरक्षेची हमी देण्याची विनंती स्थानिकांकडून करण्यात आली आहे. या घटनेमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे.