पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानकडून निमंत्रण, युक्रेननंतर मोदी पाकमध्ये जाणार का?
Narendra Modi: पाकिस्तानमध्ये येत्या 15-16 ऑक्टोबर एससीओ परिषद होणार आहे. रोटेटिंग पद्धतीने या परिषदेचे आयोजनपद दिले जाते. युरेशियन गटातील राष्ट्रप्रमुखांची ही दुसरी सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच युक्रेन दौरा केला. या दौऱ्याची चर्चा जगभरात झाली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचे निमंत्रण मिळाले आहे. पाकिस्तानात ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या शांघाय शिखर परिषदेसाठी (Shanghai Cooperation Organisation) पाकिस्तानने नरेंद्र मोदी यांना आमंत्रण पाठवले आहे. या परिषदेसाठी नरेंद्र मोदी यांच्याशिवाय इतर नेत्यांनाही पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी बोलवले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेसाठी जाणार की भारताचा प्रतिनिधी पाठवणार किंवा परिषदेत कोणालाच पाठवणार नाही? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
मोदी यांनी दिला होता संदेश
भारताने एससीओ परिषदेसाठी पाकिस्तानने दिलेल्या निमंत्रणावर भारत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. जम्मूमध्ये नुकतेच झालेले दहशतवादी हल्ले यामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहे. गेल्या महिन्यात कारगिल विजय दिवसानिमित्त आपल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव घेत इतिहासातून काहीही शिकले नसल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, पाकिस्तान दहशतवाद आणि प्रॉक्सी वॉरच्या माध्यमातून प्रासंगिक राहण्याचा प्रयत्न करत आहे.
परराष्ट्रमंत्री जयशंकर जाणार का?
एससीओमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मंत्र्याला नामनिर्देशित करण्याची पद्धत आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर गेल्या वर्षी बिश्केक येथे झालेल्या परिषदेत सहभागी झाले होते. यंदा पाकिस्तानात परिषद होत असल्यामुळे प्रत्यक्ष नाही तर व्हर्चअल पद्धतीने एस.जयशंकर यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश रशिया आणि चीन यांच्या नेतृत्वाखालील गटाचे पूर्ण सदस्य आहेत.
पाकिस्तानमध्ये येत्या 15-16 ऑक्टोबर एससीओ परिषद होणार आहे. रोटेटिंग पद्धतीने या परिषदेचे आयोजनपद दिले जाते. युरेशियन गटातील राष्ट्रप्रमुखांची ही दुसरी सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. शांघाय शिखर परिषदही एक युरेशियन राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण संस्था आहे. ही संस्था 2001 मध्ये चीन आणि रशियाने स्थापन केली आहे.