Pandit Bhajan Sopori passes away: प्रसिद्ध संतूर वादक पंडित भजन सोपोरी यांचे गुरुग्राममध्ये निधन
पंडित सोपोरी हे भारतातील एकमेव शास्त्रीय संगीतकार आहेत ज्यांनी संस्कृत, अरबीसह देशातील जवळपास प्रत्येक भाषेत चार हजारांहून अधिक गाण्यांना संगीत दिले आहे.

गरुग्राम, प्रख्यात संतूर वादक पद्मश्री पंडित भजन सोपोरी (Pandit Bhajan Sopori) यांचे वयाच्या 74 व्या वर्षी गुरुवारी गुरुग्राम येथील रुग्णालयात निधन (Died) झाले. त्यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली. पंडित भजन सोपोरी (Pandit Bhajan Sopori) काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचा जन्म 1948 साली श्रीनगर येथे झाला होता. भजन सोपोरी यांना शास्त्रीय संगीतातील (classical music) योगदानाबद्दल 1992 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला. यानंतर भारत सरकारने 2004 मध्ये त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले होते.
संगीताचा वारसा लाभला होता
भजन सोपोरी (Pandit Bhajan Sopori) यांना संतूर वादनाचा वारसा लाभला होता. त्यांचे आजोबा एस. सी. सोपोरी आणि वडील पंडित एस. एन. सोपोरी हे देखील संतूर वादक होते. संतूरचे शिक्षण त्यांनी घरीच घेतले. भजन संतूरसोबत गायनातही ते निपुण होते. त्यांनी संगीतासोबत इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. यानंतर त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठातून पाश्चात्य शास्त्रीय संगीताचेही शिक्षण घेतले होते. पंडित भजन सोपोरी यांनी तीन रागांची रचना केली आहे. यामध्ये राग लालेश्वरी, राग पतवंती आणि राग निर्मल रंजनी यांचा समावेश आहे. पंडित भजन सोपोरी हे सुफियाना घराण्याचे आहेत. पंडित भजन सोपोरी यांनी संतूरवर ‘नट योग’ हा अल्बम बनवला आहे. भजन सोपोरी हे सोपोरी अकादमी फॉर म्युझिक अँड परफॉर्मिंग आर्ट्सचे संस्थापक देखील आहेत. शास्त्रीय संगीताचा प्रसार करणे हा या अकादमीचा मुख्य उद्देश आहे.




चार हजारांहून अधिक गाण्यांना संगीत दिले
पंडित सोपोरी हे भारतातील एकमेव शास्त्रीय संगीतकार आहेत ज्यांनी संस्कृत, अरबीसह देशातील जवळपास प्रत्येक भाषेत चार हजारांहून अधिक गाण्यांना संगीत दिले आहे. सोपोरी यांनी देशाच्या एकात्मतेसाठीसुद्धा अनेक गाणी रचली आहेत. यामध्ये सरफरोशी की तमन्ना, कदम कदम बढाये जा, विजयी विश्व तिरंगा प्यारा आणि हम होंगे कामियाब या गीतांचा समावेश आहे.