Vande Bharat ट्रेनविषयी मोठी अपडेट; प्रवाशांना मिळेल ही मोठी सुविधा
Indian Railway : भारतीय रेल्वेने वंदे भारत ट्रेनमधील एका सुविधेत बदल केला आहे. प्रवाशांना त्याचा फायदा होईलच पण रेल्वे विभागाला पण फायदा होईल. या सुविधेमुळे वंदे भारत प्रवाशांना जवळच्या प्रवाशांत मोठी मदत मिळेल. वंदे भारत ही लोकप्रिय ट्रेन ठरली आहे.
पाणी हे जीवन आहे, अशी म्हण तुम्ही वाचली, ऐकली असेलच. उन्हाळ्यात तर पाण्याचे महत्व सर्वांनाच कळते. भारतीय रेल्वे पण पाण्याचे महत्व जाणून आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी भारतीय रेल्वेने अजून एक प्रशंसनीय पाऊल टाकलं आहे. उन्हाळ्याच्या सुट्यात देशातील विविध रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी लागते, हे नैसर्गिक आहे. पण अनेकदा सुविधेच्या नावाखाली नाहक पाण्याची नासाडी होते, हे पण दिसून येते. त्यामुळे भारतीय रेल्वेने वंदे भारत ट्रेनमधील पाण्याच्या बॉटलविषयी एक चांगला निर्णय घेतला आहे.
घशाला कोरड नाही, पाण्याची नासाडी नाही
भारतीय रेल्वेने पाणी बचतीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पिण्याच्या पाण्याची नासाडी त्यामुळे थांबणार आहे. वंदे भारत रेल्वेत आतापर्यंत प्रवाशांना एक लिटर पाण्याची बॉटल देण्यात येत होती. आता प्रत्येक प्रवाशाला 500 मिलीलीटरची, म्हणजे अर्धा लिटरची पिण्याच्या पाण्याची बॉटल, रेल्वे नीर पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी थांबेल. गरज पडल्यास प्रवाशी पाण्याची अतिरिक्त बॉटल मागवू शकतो. त्याला रेल्वे अर्धा लीटरची पाण्याची बॉटल देईल. त्यासाठी अतिरिक्त पैसे देण्याची गरज भासणार नाही.
का घेतला निर्णय
- आतापर्यंत वंदे भारत ट्रेनमध्ये राजधानी एक्सप्रेस प्रमाणेच एक लिटर पाण्याची बॉटल प्रवाशांना देण्यात येत होती. पण वंदे भारत ट्रेन, राजधानी एक्सप्रेस प्रमाणे लांबचा टप्पा गाठत नसल्याने रेल्वेने नियमात बदल केला आहे. त्यानुसार, आता प्रत्येक प्रवाशाला केवळ अर्धा लिटर पिण्याच्या पाण्याची बॉटल देण्यात येणार आहे. गरज पडल्यास त्याला अतिरिक्त बॉटल विना खर्च मागविता येईल.
- शताब्दी ट्रेनमध्ये यापूर्वीच अर्धा लिटर पिण्याच्या पाण्याची बॉटल देण्यात येत आहे. वंदे भारत ट्रेनच्या तुलनेत शताब्दी रेल्वे कमी अंतर कापतात. त्यामुळे प्रवाशांना एक लिटर पाणी देऊनही त्याचा उपयोग होत नसल्याचे दिसून आले. अनके प्रवाशी थोडंस पाणी पिऊन ती बॉटल तशीच सोडून जात असल्याचे समोर आल्याने नंतर हा निर्णय घेण्यात आला.