PM Modi Untold Stories : लहानपणी मगरीचं पिल्लू पकडून घरी आणलं, नरेंद्र मोदींचे 10 भन्नाट किस्से
PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक जीवन अनेक चढउतार आणि रंजक गोष्टींनी भरलेले आहे. अशाच काही रंजक गोष्टींचा घेतलेला हा आढावा.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला होता. बालपणी त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. मात्र, या खडतर परिस्थितीशी संघर्ष करत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदापर्यंत झेप घेतली. सध्याच्या घडीला ते केवळ भारताचे पंतप्रधान म्हणून नव्हे तर आंतराराष्ट्रीय पातळीवरील लोकप्रिय नेता म्हणूनही नावाजले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक जीवन अनेक चढउतार आणि रंजक गोष्टींनी भरलेले आहे. अशाच काही रंजक गोष्टींचा घेतलेला हा आढावा. (PM Narendra Modi birthday)
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लहानपणापासूनच संन्यासी व्हायचे होते. गुजरातच्या वडनगरमध्ये जन्मलेल्या नरेंद्रला लहानपणापासूनच ऋषीमुनींचे जीवन आणि संन्यासाविषी आकर्षण होते. नरेंद्र मोदी यांचे बालपण 6 भावंडांच्या कुटुंबात गरीबीत गेले. त्याच्या वडिलांचे वडनगर रेल्वे स्टेशनवर चहाचे दुकान होते. नरेंद्र मोदी लहानपणी शाळेतून आल्यानंतर याठिकाणी चहा विकायचे. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला निघाले.
2. नरेंद्र मोदी यांचे शालेय शिक्षण वडनगरमध्येच झाले. ते लहानपणापासूनच वक्तृत्व कलेत निपुण होते. आजही ते सामान्य लोकांना भावेल अशा शैलीत भाषण करतात. अर्थात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरीच मेहनत आणि अभ्यास केला आहे.
3. नरेंद्र मोदी लहानपणापासून एक गुणी विद्यार्थी होते. त्यांना विज्ञान आणि इतिहास विषयांची खूप आवड होती. त्यांना अभ्यासाशिवाय इतर गोष्टींमध्येही गती होती. त्याचा प्रभाव आजही त्यांच्या भाषणांमध्ये दिसून येतो. अगदी लहानपणीही नरेंद्र मोदी यांचा आवाज आणि अभिनय कौशल्याचीही शाळेत चर्चा असे. नरेंद्र मोदी यांना चांगले पोहताही येते.
4. नरेंद्र मोदी एकदा बालपणीच्या मित्रासोबत शर्मिष्ठा सरोवरावर गेले होते. त्यावेळी मोदींनी तेथील मगरीचे एक पिल्लू उचलून घरी आणले होते. अखेर आईने समजावून सांगितल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मगरीच पिल्लू पुन्हा तलावात नेऊन सोडले होते.
5. नरेंद्र मोदी लहानपणीही खोडकर होते. त्यांनी मन की बात कार्यक्रमात एक किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितले होते की, लहानपणी ते सनई वादकांना चिंच दाखवायचे. जेणेकरुन सनई वादकांच्या तोंडाला पाणी सुटेल आणि त्यांना सनई नीट वाजवायला जमणार नाही. अशा खोडकरपणातूनही लहान मुलांचा विकास होतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते.
6. नरेंद्र मोदींना लहानपणापासूनच प्राणी आणि पक्ष्यांविषयी प्रेम आहे. किशोर मकवाना यांनी ‘कॉमन मॅन नरेंद्र मोदी’ मध्ये एक किस्सा लिहिला आहे. शालेय काळात नरेंद्र एका एनसीसी शिबिरात गेले जेथे बाहेर जाण्यास मनाई होती. मोदी एका खांबावर चढत असल्याचे पाहून गोवर्धनभाई पटेल नावाच्या शिक्षकाला खूप राग आला, पण दुसऱ्याच क्षणी नरेंद्रने खांबावर चढून अडकलेल्या पक्ष्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना पाहिले. यानंतर नरेंद्रच्या या कृत्याचे त्यांनी कौतुक केले.
7. नरेंद्र मोदींच्या ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेभोवती भिंत उभारायची होती. मात्र, त्यावेळी शाळेकडे पैसे नव्हते. तेव्हा नरेंद्र यांनी पुढाकार घेत एक नाटक बसवले. या नाटकाच्या प्रयोगातून आलेले पैसे नरेंद्र मोदी यांनी शाळेला भिंत बांधण्यासाठी दिले होते.
8. नरेंद्र मोदींच्या घराची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. कुटुंबाला शूज खरेदी करणे शक्य नव्हते. एकदा काकांनी त्याला पांढरे कॅनव्हासचे शूज विकत घेतले. जर रंग पांढरा असेल तर शूज लवकर खराब होण्याची भीती होती. नरेंद्र मोदींकडे बुटाच्या पॉलिशसाठी पैसे नव्हते. म्हणून त्यांनी एक मार्ग शोधला. शिक्षक जे खडूचे तुकडे फेकत असत, नरेंद्र ते गोळा करायचे आणि नंतर त्यांची पावडर बनवल्यानंतर ते भिजवून त्याच्या शूजवर लावायचे. त्यामुळे शूज हे चकचकीत दिसायचे.
9. नरेंद्र मोदींच्या 66 व्या वाढदिवशी बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी एक किस्सा सांगितला होता. “मी तुम्हाला पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटलो. ते एक साधे घर होते आणि ती एक अतिशय साधी खोली होती. माझ्या ‘पा’ चित्रपटासाठी कर माफीची मागणी करण्यासाठी मी तुम्हाला भेटायला गेलो होतो. मग तुम्ही म्हणालात की चित्रपट एकत्र बघूया. त्यावेळी तुम्ही मला स्वत:च्या गाडीतून थिएटरमध्ये घेऊन गेलात. माझ्याबरोबर चित्रपट पाहिला आणि एकत्र जेवण केले. दरम्यान, तुमच्यासोबत गुजरात पर्यटनाबाबतही चर्चा झाली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांची गुजरातच्या पर्यटनखात्याचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती झाली होती.
10. रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याचे भाकीत आधीच केले होते. त्यांचे उद्योगपती मुलगा अनिल अंबानी यांनी याबद्दल सांगितले होते. हा किस्सा शेअर करताना अनिल अंबानी यांनी म्हटले होते की, “मी नरेंद्र मोदींना 1990 मध्ये पहिल्यांदा भेटलो. माझे वडील धीरूभाई अंबानी यांनी त्यांना घरी जेवायला बोलावले होते. संभाषणानंतर, बाबा मोदींविषयी म्हणाले होते, “लंबी रेस ने घोड़ो छे, लीडर छे, पीएम बनसे. उनका मतलब था- ये लंबी रेस का घोड़ा है, सही मायने में लीडर है, ये प्रधानमंत्री बनेगा. पापा ने उनकी आंखों में सपने देख लिए थे. वो वैसे ही थे जैसे अर्जुन को अपना विजन पता होता था.”