New Parliament of India : देशाला मिळालं नवं संसद भवन, पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; सेंगोलचीही स्थापना
बरोबर सकाळी 7.15 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा विधी करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांनी साष्टांग दंडवत घालत सेंगोलचं दर्शन घेतलं. अधिनम मठाच्या संतांनी हा सेंगोल मोदी यांच्या हस्ते सुपूर्द केला.
नवी दिल्ली : देशाला नवं संसद भवन मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात देशाच्या नव्या संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. साधूसंतांच्या मंत्रोच्चारात हा कार्यक्रम सोहळा पार पडला. नव्या संसदेचं लोकार्पण करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सेंगोल (राजदंड)ची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर सर्व धर्मीयांची प्रार्थना पार पडली.
बरोबर सकाळी 7.15 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा विधी करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधानांनी साष्टांग दंडवत घालत सेंगोलचं दर्शन घेतलं. अधिनम मठाच्या संतांनी हा सेंगोल मोदी यांच्या हस्ते सुपूर्द केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकसभा अध्यक्षांच्या उजव्या हाताला मंत्रोच्चारात सेंगोलची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पंतप्रधांनांनी सर्व सांधूसंत आणि धार्मिक गुरुंना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं.
कामगारांचा सत्कार
या सोहळ्यानंतर मोदी यांच्या हस्ते कामगारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर संसदेच्या प्रांगणातच सर्व धर्मीय प्रार्थना सुरू झाल्या. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवर या प्रार्थना सभेला उपस्थित होते. अत्यंत धार्मिक आणि पवित्र वातावरणात हा सोहळा पार पडला.
गांधींना अभिवादन
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनात आले. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. त्यानंतर पूजाविधीला सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशातील अनेक राज्यातील मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यांचा विरोध
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संसदेचं उद्घाटन करण्यात येणार नसल्याने 21 राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेससह टीएमसी, डीएमके, आप, राष्ट्रवादी पार्टी, ठाकरे गट, समजावादी पार्टी, आरजेडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, सीपीआय, इंडियन मुस्लिम लीग, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस (मणि) राष्ट्रीय लोकदल, रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी, व्हिसीके, एमडीएके आदींनी बहिष्कार टाकला आहे.
यांचा पाठिंबा
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला 25 राजकीय पक्ष उपस्थित होते. या सोहळ्याला भाजप, शिवसेना (शिंदे), नॅशनल पीपुल्स पार्टी मेघालय, नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी, सिक्किम क्रांतिकारी मोर्चा, जन नायक पार्टी एआईडीएमके, आईएमकेएमके, एजेएसयू, आरपीआय, मिजो नॅशनल फ्रंट, तमिल मानिला काँग्रेस, आयटीएफटी, बोडो पीपुल्स पार्टी पट्टाली मक्कल काची, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी, अपना दल, असम गण परिषद, लोक जनशक्ति पार्टी (पासवान), बीजेडी, बीएसपी, टीडीपी, वायएसआरपीसी, अकाली दल आणि जेडीएस आदी पक्षाचे नेते उपस्थित होते.