पंतप्रधान मोदी यांचे सर्वात विश्वासू सहकारी पीके मिश्रा कोण आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना देखील सोबत ठेवले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एनएसए अजित डोवाल आणि प्रधान सचिव डॉ. पीके मिश्रा यांची पुन्हा एकदा पुढील पाच वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले आहेत. गेल्या दोन निवडणुकीपेक्षा कमी यश भाजपला मिळालं असलं तरी देखील एनडीएचं सरकार आणण्यात त्यांना यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांच्या दोन सर्वात विश्वासू सहकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मोदी सरकार 3.0 मध्ये पंतप्रधान मोदी यांचे सर्वात विश्वासू सहकारी कायम ठेवले आहेत. नव्या एनडीए सरकारमध्ये अजित डोवाल यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तर डॉ. प्रमोद कुमार मिश्रा यांना पुन्हा एकदा पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त केले आहे. पीके मिश्रा यांना 2019 मध्ये पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव बनवण्यात आले होते. त्यांच्याआधी नृपेंद्र मिश्रा हे या पदावर काम करत होते. कोण आहेत डॉ. प्रमोद कुमार मिश्रा उर्फ पीके मिश्रा जाणून घ्या.
कोण आहेत पीके मिश्रा?
प्रमोद कुमार मिश्रा पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव बनले आहेत. ते गुजरात केडरचे 1972 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव होण्याआधी त्यांनी कृषी आणि सहकार सचिव या पदावर पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव म्हणूनही काम केले होते. डॉ पीके मिश्रा यांनी ससेक्स विद्यापीठातून अर्थशास्त्र/विकास अभ्यासात पीएचडी केली आहे. यासोबतच त्यांना संयुक्त राष्ट्र सासाकावा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. प्रमोद कुमार मिश्रा यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींसोबत काम करण्यास सुरुवात केली होती. याआधी पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, प्रमोद कुमार मिश्रा 2001-2004 या वर्षात त्यांचे प्रधान सचिव होते.
पंतप्रधानांचे प्रधान सचिव कोण आहेत?
पंतप्रधानांचे प्रधान सचिव हे पद इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात निर्माण करण्यात आले होते. पंतप्रधानांचे प्रधान सचिव हे पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख असतात. ते भारत सरकारचे कॅबिनेट सचिव देखील असतात. काही पंतप्रधान भारत सरकारच्या कॅबिनेट सचिव पदावर असलेले अतिरिक्त प्रधान सचिव देखील नियुक्त करतात.