सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांनी दिला 4N चा मंत्र, काय म्हणाले नरेंद्र मोदी…
भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. नवीन स्टार्टअप्ससाठी वेगाने नोंदणी होत आहेत. अंतराळ क्षेत्रात आता खाजगी उद्योगांनी प्रवेश केला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेत नवीन मंत्र देशभरातून आलेल्या अधिकाऱ्यांना दिला. विकसित भारताच्या उभारणीसाठी आता 4N चा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. 4N म्हणजे infrastructure ( सुविधा) investment (गुंतवणूक) innovation (नावीन्य) आणि inclusion (समावेश) या चार स्तंभांवर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
मुख्य सचिवांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेचा रविवारी समारोप झाला. त्याला मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘एस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम‘चीही सुरुवात केली. तसेच राज्यस्तरावर सुरु असलेल्या एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रामचे अनुकरण करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांना दिला.
कार्यक्रमाला येण्यापुर्वी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, जनतेचे जीवन चांगले बनवणे व विकसित भारताच्या मार्गावर जाण्यासाठी कठोर परिश्रम करा. मागील दोन दिवसांपासून मुख्य सचिवांच्या संमेलनात आपण व्यापक चर्चा करत आहोत. आता त्यावर काम करण्याची गरज आहे. त्यामुळे जनतेचे जीवन अधिक चांगले बनले.
कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आज संपूर्ण जग जागतिक पुरवठा साखळीत स्थिरता आणण्याच्या दृष्टीकोनातून भारताकडे पाहत आहे. एमएसएमई उद्योगांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आपल्याला महत्त्वाची पावले उचलावी लागणार आहेत. त्यामुळे जागतिक साखळी निर्माण करता येईल.
देशभरातून आलेल्या सचिवांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले की, आम्हाला आमची भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा मजबूत करावी लागणार आहे. तसेच सायबर सुरक्षा बळकट करण्यावर भर द्यावा लागेल. सायबर सुरक्षा हा मोठा प्रश्न आहे. भारताच्या प्रस्तावामुळे युनोने बाजरीला आंतरराष्ट्रीय वर्ष जाहीर केले आहे. यामुळे आता बाजरीचे महत्व व त्याची लोकप्रियता वाढवण्यावर आपण भर दिला पाहिजे.
प्रगतीचा घेतला आढावा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने मिळवलेल्या यशाचा आढावा घेतला. भारताला G20 चे अध्यक्षपद मिळाले आहे. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. नवीन स्टार्टअप्ससाठी वेगाने नोंदणी होत आहेत. अंतराळ क्षेत्रात आता खाजगी उद्योगांनी प्रवेश केला आहे. राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण जाहीर केले आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन मंजूर दिली गेली आहे.
कशासाठी घेतले संमेलन : नवी दिल्लीत 5 जानेवारीपासून मुख्य सचिवांची परिषद सुरु आहे. त्या परिषदेचा उद्देश राज्यांशी समन्वय वाढवून वेगाने आर्थिक विकास साधणे हा आहे. या राष्ट्रीय परिषदेचा रविवारी समारोप झाला.