लोकशाहीपासून कोरोनापर्यंत आणि पाकिस्तानपासून अंतराळापर्यंत मोदी-कमला हॅरीस यांच्यात चर्चा, भारतभेटीचंही निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील संबंधांचे कौतुक केले.
PM Modi Visit US : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील संबंधांचे कौतुक केले. या बैठकीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या नेतृत्वाखाली द्विपक्षीय संबंध नवीन उंचीवर पोहोचतील, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. या भेटीत लोकशाही ते पाकिस्तान आणि कोरोना ते अंतराळ अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी दोन्ही राजकारण्यांच्या भेटीसंदर्भात एक निवेदन जारी केलंय. पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांनी अलीकडील जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींवर चर्चा केली. कोविड आणि लसीकरण हा त्यांच्या चर्चेचा मुख्य भाग होता. दोन्ही देशांनी भविष्यात अंतराळ सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्रात एकत्र काम करण्यावर चर्चा केली आहे, असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.
अमेरिका-भारताच्या मुल्यांमध्ये समानता
जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी लोकशाही म्हणून भारत आणि अमेरिका नैसर्गिक भागीदार आहेत. आपल्या मूल्यांमध्ये समानता आहे. आमचा समन्वय आणि सहकार्य देखील सातत्याने वाढत आहे, असं मोदी म्हणाले. जेव्हा भारत कोविडच्या दुसऱ्या लाटेत संकटात सापडला होता तेव्हा भारताला मदत केल्याबद्दल मोदींनी अमेरिकेचे आभारही मानले. त्याचबरोबर अमेरिकन सरकार, कंपन्या आणि भारतीय समुदाय सर्व मिळून भारताला मदत करण्यासाठी एकत्र आल्याचा आवर्जून उल्लेख मोदींनी यावेळी केला.
मोदी-कमला बैठकीत पाकिस्तानवरही चर्चा
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सीमापार दहशतवादासंदर्भात पंतप्रधान मोदींशी सहमती दर्शविली. भारत अनेक दशकांपासून दहशतवादाचा बळी आहे. दहशतवादी गटांना पाकिस्तान जर पाठिंबा देत असेल, तर बारीक लक्ष ठेवण्याच्या गरजेवरही हॅरीस यांनी सहमती दर्शविली. कमला हॅरिस यांनी दहशतवादावर पाकिस्तानच्या भूमिकेचा उल्लेख करत पाकिस्तानात दहशतवादी गट कार्यरत होते. या गटांनी अमेरिकेच्या सुरक्षा आणि भारतावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी पाकिस्तानला या संदर्भात कारवाई करण्यास सांगितले आहे.
मोदींकडून कमला हॅरीस यांना भारत भेटीचं निमंत्रण
पंतप्रधान मोदींनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. “तुमचा विजयी प्रवास ऐतिहासिक आहे. भारतातील जनतेला या ऐतिहासिक विजयाचा सन्मान, स्वागत करणं आवडेल, म्हणून मी तुम्हाला भारतात येण्याचं आमंत्रण देतो”, असं मोदी म्हणाले. प्रत्युत्तरादाखल तुम्ही जगातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहात, असं कमला हॅरिस मोदींना म्हणाल्या.
भारत अमेरिकेचा महत्वाचा भागीदार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वॉशिंग्टन डीसीमध्ये स्वागत करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, असं सांगत इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा दोन्ही देश एकमेकांच्या बाजूने उभे राहिलो, तेव्हा दोन्ही देशांनी स्वतःला अधिक सुरक्षित, मजबूत आणि समृद्ध मानले आहे, असं कमला हॅरीस म्हणाल्या. कमला हॅरिस यांनी भारताला अमेरिकेचा ‘अत्यंत महत्वाचा भागीदार’ म्हटलं.
हे ही वाचा :