सत्तेसाठी त्यांच्या सर्व खेळी, घराणेशाहीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
PM Narendra Modi at Varanasi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसी येथील सभेत घराणेशाहीवर कडाडून हल्लाबोल केला. आम्ही सबका साथ, सबका विकास करू इच्छितो. पण काही लोक केवळ सत्ता काबीज करण्यासाठी खेळ करतात, ते केवळ घराणेशाहीवर लक्ष देतात, असा प्रहार त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज त्यांचा मतदारसंघ, वाराणसीत होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांच्या घराणेशाहीवर कडाडून हल्लाबोल चढवला. देशाची सेवा हाच आमचा मंत्र आहे, असे ते म्हणाले. सबका साथ, सबका विकास हाच आपला मंत्र असल्याचे ते म्हणाले. पण काही जण केवळ सत्ता काबीज करण्यासाठी खेळी करतात. ही लोक केवळ त्यांच्या कुटुंबाचा विचार करतात. केवळ घराणेशाही आणि कुटुंबाचा विकास हेच त्यांचे ध्येय असल्याचा घणाघात पंतप्रधानांनी यांनी केला.
वाराणसी येथे पंतप्रधान मोदी यांनी 3880 कोटी रुपयांच्या 44 योजनांचे लोकार्पण केले आणि या कामाची कोनशिला ठेवली. गेल्या 10 वर्षात वाराणसीत विविध विकास कामे सुरू आहेत. आज काशी केवळ प्राचीन शहर नाही तर एक प्रगतीशील शहर असल्याचे ते म्हणाले. आपण काशी या शहराचे कर्जदार आहोत. काशी हे शहर माझे आणि मी या शहराचा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
काशी आता आरोग्य राजधानी
पूर्वी पूर्वोत्तर राज्यात आरोग्यविषयक सुविधांचा मोठा अभाव होता. पण आज काशी ही आरोग्य राजधानी ठरू पाहत आहे. दिल्ली, मुंबईतील मोठं मोठी रुग्णालये या शहरात आली आहेत. हाच तर विकास आहे. जिथे सोयी-सुविधा नागरिकांसाठी हाकेच्या अंतरावर असतात. गेल्या 10 वर्षात आम्ही केवळ रुग्णालयाची संख्या वाढवली नाही. पण आम्ही इतर सोयी-सुविधा देण्यावर पण भर दिला आहे.
आज भारत विकास आणि वारसा घेऊन पुढे जात आहे. काशी हे शहर याचे उत्तम उदाहरण आहे. काशीमध्ये अनेक सोयी-सुविधा येत आहेत. आता उपचारासाठी येथे कुणाला जमीन विकायची गरज नाही, कर्ज घेण्याची गरज नाही. आता उपचारासाठी बड्या शहरात जाण्याची गरज नाही, असे पंतप्रधान म्हणाले. आयुष्यमान भारत योजनेत सरकार उपचारासाठी पैसे देते असे त्यांनी सांगितले.
काशीत भारताचा प्रत्येक रंग
काशीच्या प्रत्येक भागात, गल्लीत भारत वसला आहे. भारताचे विविध रंग काशीत सामावलेले आहेत. आज जो पण काशीमध्ये येतो, तो येथील सुविधांचे कौतुक करतो. विविधतेत एकता हीच भारताची आत्मा आहे आणि काशी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. येथे गंगा आणि भारताची चेतना वाहते असे ते पंतप्रधान मोदी म्हणाले.