Israel-Hamas War | पंतप्रधान मोदींची भूमिका मानवतेला धरुन पण कदाचित इस्रायलला नाही आवडणार
Israel-Hamas War | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा इस्रायल-हमास युद्धावर ठाम भूमिका मांडली आहे. त्यांची ही भूमिका कदाचित इस्रायलला नाही पटणार. पण पंतप्रधान मोदींनी निषेध केलाय. मोदींची भूमिका ही मानवतेला धरुन आहे.
नवी दिल्ली : इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा ठामपणे आपली भूमिका मांडली आहे. व्हॉईस ऑफ द ग्लोबल साऊथ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. पश्चिम आशिया क्षेत्रातील नवीन आव्हान आणि भारताच्या संयमी भूमिकेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. भारत हा इस्रायलचा सच्चा मित्र देश म्हणून ओळखला जातो. 7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून जो हिंसाचार, अत्याचार केला. त्याचा सर्वात आधी निषेध करणाऱ्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. भारताची भूमिका इस्रायलला अनुकूल आहे, असा अर्थ काढून देशातील विरोधी पक्ष आणि अन्य काही देशांनी टीका केली. पण भारताने वेळोवेळी दहशतवादाच्या विरोधात आहोत, हे दाखवून दिलय.
“इस्रायल-हमास युद्धात सर्वसामान्य नागरिकांचा जो मृत्यू होतोय, त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. आमचा भर चर्चा आणि डिप्लोमसीवर आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मानवतेच्या दृष्टीकोनातून पॅलेस्टाइनला मदत पाठवली. “जगाच्या भल्यासाठी ग्लोबल साऊथच्या देशांनी एकत्र आलं पाहिजे. हीच ती वेळ आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पॅलेस्टाइन बाबत भारताची भूमिका काय?
संयुक्त राष्ट्रात पॅलेस्टाइनच्या बाजूने एका ठरावात भारताने मतदान केलं. एकूण 145 देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं. कॅनडा, इस्रायल या देशांनी विरोधात मतदान केलं. 18 देश अनुपस्थित राहिले. इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षावर दोन देशांचा पर्याय ही भारताची भूमिका आहे. युद्धात सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे, ही भारताची भूमिका राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जी भूमिका मांडली, ती कदाचित इस्रायलला आवडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युद्धात सर्वसामन्य नागरिकांचा जो बळी जातोय, त्याचा निषेध केला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत जवळचे मित्र समजले जातात.