संपूर्ण देशभरात लॉकडाऊन, जनता कर्फ्यूपेक्षा कडक कर्फ्यू, घराबाहेर पडण्यास मज्जाव : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी मोठी घोषणा केली आहे (Complete Lockdown in India amid Corona). आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन केलं जात आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी मोठी घोषणा केली आहे (Complete Lockdown in India amid Corona). आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन केलं जात आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला आणि त्यांच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. हा जनता कर्फ्यूच्या पुढील टप्पा असेल, असंही त्यांनी नमूद केलं. यानुसार घराच्या बाहेर पडण्यावर बंदी असणार आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, “आज रात्री 12 वाजल्यापासून पूर्ण देशात संपूर्ण लॉकडाऊन होत आहे. भारताला वाचवण्यासाठी, भारताच्या प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आज रात्री 12 वाजल्यापासून घरातून बाहेर निघण्यावर बंदी आहे. देशातील प्रत्येक राज्याला, प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाला, जिल्हा, गाव, गल्ली प्रत्येक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत आहे.”
LIVETV – आजपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन, पुढील २१ दिवस लॉकडाऊन लागू – पंतप्रधान मोदी लाईव्ह https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/nuxXBM4itA
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2020
कोरोनाच्या जागतिक महामारीला तुम्ही बघत आणि ऐकत आहात. कोरोनाने मोठमोठ्या देशांना असाहाय्य केलं आहे. ते देश प्रयत्न करत नाहीत किंवा त्यांना संसाधनांची कमी आहे, असंही नाही. मात्र कोरोना इतक्या वेगाने पसरत आहे की कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती भीषण होत चालली आहे. तज्ज्ञही तेच सांगत आहेत. ‘सोशल डिस्टन्सिंग’ हाच त्यावर एकमेव पर्याय आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी याशिवाय कोणताच पर्याय नाही. कोरोनाला रोखायचं असेल तर त्याच्या संक्रमणाची साखळी तोडावी लागेल. काही लोक या गैरसमजात आहेत की, सोशल डिस्टंन्सिंग फक्त रुग्णांसाठी आहे. मात्र, ते चूक आहे. हे प्रत्येकासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. काही लोकांचे चुकीचे विचार तुम्हाला, परिवाराला आणि पुढे पूर्ण देशाला मोठ्या संकटात टाकतील. पुढे असेच चालू राहिलं तर भारताला मोठा फटका बसेल, असंही नरेंद्र मोदींनी नमूद केलं.
मागील 2 दिवसात सर्व राज्यांमध्ये लॉक डाऊन करण्याला सुरुवात झाली आहे. कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी देश महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात पूर्ण लॉकडाऊन केला जाईल. देश आणि देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाला घराबाहेर पडण्यावर बंदी असेल. देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्र शासित प्रदेश, शहर, गावांमध्ये याची अंमलबजावणी होईल. हा कर्फ्यू जनता कर्फ्यूपेक्षा कडक असेल. त्याच्या पुढचं पाऊल असेल, असंही त्यांनी सांगितलं.
“21 दिवस खबरदारी घेतली नाही, तर आपला देश 21 वर्ष मागे जाईल”
नरेंद्र मोदी म्हणाले, “कोरोना विरोधात लढण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक आहे. याची आर्थिक किंमत देशाला भोगावी लागेल. मात्र, देशाला वाचवणं ही भारत सरकार, राज्य सरकार, लोकप्रतिनिधी आणि माझी प्राथमिक जबाबदारी आहे. म्हणूनच तुम्ही जिथं आहात तिथंच राहा. हा लॉकडॉकन 21 दिवसांसाठी असेल. याचा अर्थ पुढील 3 आठवड्यांसाठी असेल. येणारे दिवस फार महत्त्वाचे आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 21 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे 21 दिवस खबरदारी घेतली नाही, तर आपला देश 21 वर्ष मागे जाईल. अनेक कुटुंब संपतील. ही गोष्ट मी पंतप्रधान म्हणून नाही, तर आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून सांगत आहे. त्यामुळे बाहेर पडू नका. घरातच राहा. आजच्या या निर्णयाने आपल्या घराच्या दरवाजाबाहेर लक्ष्मणरेषा आखा. घराबाहेर पडणारं एक पाऊल कोरोनाला घरात आणू शकतं. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे.”
संबंधित बातम्या :
अनेकजण विचारतात या परिस्थितीत आम्ही काय करू, मी म्हणतो … : उद्धव ठाकरे
पुण्यात पेट्रोल-डिझेल विक्री बंद, गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
EXCLUSIVE | विनंती झाली, आता हिसका दाखवा, गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश