त्याने चक्क 14 वर्षे वाट पाहिली, मग खुद्द मोदींनी.., रामपाल कश्यप यांनी घेतलेली शपथ अखेर पूर्ण!
मोदी यांनी आपल्या या दौऱ्यात एका खास व्यक्तीची भेट घेतली. या व्यक्तीच्या भेटीचा व्हिडीओ खुद्द मोदी यांनी त्यांच्या समाजमाध्यम खात्यांवर शेअर केला आहे.

Narendra Modi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हरियाणातील यमुनानगरच्या दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी एका सभेला संबोधित केले. तसेच अनेक विकसाकांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी आपल्या या दौऱ्यात एका खास व्यक्तीची भेट घेतली. या व्यक्तीच्या भेटीचा व्हिडीओ खुद्द मोदी यांनी त्यांच्या समाजमाध्यम खात्यांवर शेअर केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी कोणाची भेट घेतली?
हरियाणाच्या दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी यांना एका खास व्यक्ती भेटायला आली. या व्यक्तीचे नाव रामपाल कश्यप असे आहे. कश्यप यांच्याशी भेटल्यानंतर मोदींनी या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्यक्तीने एक शपथ घेतली होती. जोपर्यंत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होत नाहीत आणि जोपर्यंत माझी त्यांच्याशी भेट होत नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, अशी शपत कश्यप यांनी घेतली होती. गेल्या 14 वर्षांपासून कश्यप हे अनवाणी पायांनी काम करतात. आता मात्र त्यांची मोदी यांच्याशी भेट झाली आहे.
मी सर्व सहकाऱ्यांचा भावनांचा आदर करतो, पण…
या भेटीचा व्हिडीओ टाकताना मोदी यांनी कश्यप यांच्याबाबत सविस्तर लिहिलं आहे. ‘हरियाणातील यमुनानगरमध्ये आज कैथलचे रामपाल कश्यप यांना भेटण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. त्यांनी 14 वर्षांपूर्वी एक शपथ घेतली होती. मोदी जोपर्यंत पंतप्रधान होणार नाहीत, तसेच मी जोपर्यंत त्यांना भेटणार नाही, तोपर्यंत पायात बूट न घालण्याचा प्रण त्यांनी केला होता. आज मी त्यांची भेट घेतली,’ अशी माहिती मोदी यांनी दिली. तसेच ‘मी माझ्या अशा सर्वच सहकाऱ्यांचा आदर करतो. मात्र मी विनंती करतो की अशा प्रकारची शपथ घेण्याऐवजी समाजसेवा करावी. देशहिताचे कार्य करण्याची शपथ घ्यावी,’ असे आवाहनही त्यांनी केले.
मोदींनी केली कश्यप यांची विचारपूस
मोदी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत कश्यप हे मोदींना भेटायला आलेले दिसत आहेत. भेटायला येताना त्यांच्या पायात चप्पल किंवा बूट नाहीये. या भेटीदरम्यान मोदी यांनी त्यांची विचारपूस केली. तसेच स्वत:च्या हातांनी कश्यप यांना घालण्यासाठी बूट दिले. तसेच मोदी यांनी मोठ्या मनाने कश्यप यांना बूट घालण्यासाठी मदतही केली. तुम्ही असा प्रण का केला होता? अशी विचारपूस करतानाही मोदी या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
तसेच मोदी यांनी भविष्यात अशा प्रकारची शपथ घेऊ नका. चांगले काम करा, असा संदेशही मोदी यांनी कश्यप यांना दिला. मोदींनी कश्यप यांना त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या. या व्हिडीओत कश्यप मोदींचे आभार मानताना दिसत आहेत.