PM नरेंद्र मोदींनी सांगितलं पुन्हा सत्तेत आल्यावर कोणाला मिळणार मंत्रीपद?
Modi Government : लोकसभा निवडणुकीच्या आधी आता भाजप कामाला लागली आहे. मोदी सरकारमधील मंत्र्यांना पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना मंत्रीपद मिळेल की नाही याचा विचार न करता पुढील रोडमॅप तयार करण्याच्या सूचना केल्य़ा आहेत.
मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन भाजपने आपली रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री परिषदेची ३ मार्च रोजी बैठक होणार आहे. या बैठकीला कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळाची ही अत्यंत महत्त्वाची बैठक असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार असा भाजपला विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी मंत्र्यांना पुढील नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निवडणुकीच्या काळात सरकारचे काम मंदावू नये, यासाठी मोठा संदेश देण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी मंत्र्यांकडून मागितला कृती आराखडा
बुधवारी मोदी सरकारमधील मंत्र्यांनी महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना पुढील 100 दिवसांचा कृती आराखडा विचारला. यासोबतच पीएम मोदींनी मंत्र्यांना पुढील पाच वर्षांचा रोडमॅप देण्यास सांगितले. पंतप्रधान मोदींनी यावेळी सर्व मंत्र्यांना मागितलेली माहिती कॅबिनेट सचिवालयाकडे पाठवण्याचे निर्देश दिले. पुन्हा संधी मिळेल की नाही याचा विचार न करता सर्व मंत्र्यांनी आपापल्या कल्पना, कृती योजना आणि रोडमॅप पाठवावेत, असे पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले.
भाजपला विजयाचा विश्वास
लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळेल असा दावा पंतप्रधान मोदी यांच्यापासून प्रत्येक छोटा कार्यकर्ता करत आहे. त्यामुळे विजयाची आशा असलेल्या भाजपने आतापासून जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान मोदींनी म्हणूनच मंत्र्यांकडून पुढील पाच वर्षांचा रोड मॅप आणि 100 दिवसांचा कृती आराखडा मागवलाय. निवडणुकीच्या आधी सरकारी कामाच्या गतीवर कोणताही परिणाम होणार नाही. याची देखील काळजी घेतली गेली आहे.
निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी या बैठका होत आहेत. निवडणूक आयोग सध्या निवडणूक प्रक्रियेसाठी तयारीचा आढावा घेत आहे. मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची अपेक्षा आहे.