Narendra Modi TV9 Interview : देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा ? काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
PM Modi Exclusive Interview : देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसोबतच इतर अनेक ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य केलं. पाच संपादकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले. देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा ? याबद्दल पंतप्रधान काय म्हणाले ? वाचा सविस्तर..
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातलं राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. सत्ताधारी असोत वा विरोधक सध्या सगळेच विविध आश्वासनं देत आहे. गॅरेंटी शब्दाचा सर्रास वापर केला जात आहे. अब की बार मोदी सरकार, अब की बार 400 पार यासोबत सध्या मोदीकी गॅरेंटी हा शब्दही महत्वाचा ठरत आहे. विरोधकांकडून या शब्दाची खिल्ली उडवली जाते पण दुसरीकडे राहुल गांधीही गॅरंटी देत आहे. आमचं सरकार आलं तर एका झटक्यात गरीबी दूर करू असं राहुल गांधी सांगत आहेत. मग देशाने कोणाच्या गॅरेंटीवर विश्वास ठेवायचा ? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना TV9 च्या विशेष मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर पंतप्रधानांनी सविस्तर उत्तर दिले. काय म्हणाले नरेंद्र मोदी ?
गॅरेंटी शब्दावर कॉपीराईट नाही
गॅरंटी शब्दावर माझा कॉपीराईट नाही. प्रत्येकाला त्याचा उपयोग करावा लागतो. ज्यांना बनावट माल विकायचा असतो, ते मोठ्या प्रॉडक्टचे शब्द घेऊन प्रचार करत असतात. तेव्हा त्यांची अडचण ही आहे की त्यांना शब्दाचा वापर करावा लागतो. पण गॅरंटी अशी मिळत नाही. मोठ्या तपश्चर्येनंतर तुमचे शब्द हे गॅरंटी बनतात. तुमच्या शब्दाला किंमत मिळते, असे सांगत त्यांनी विरोधकांवर हल्ला केला.
पंतप्रधानांनी सांगितला तो किस्सा
मी गुजरातला होतो. अमरोली जिल्ह्यातील काही लोक आले, तेव्हा निवडणुका व्हायच्या होत्या. ते मला म्हणाले, फक्त एवढंच (शब्द) बोला, काम होईल. मी म्हटलं मी नाही बोलणार. ते म्हणाले, साहेब तुम्ही बोलून टाका ना. मी म्हटलं, ज्या गोष्टीची योजना तयार नाही. त्या विषयावर मी बोलणार नाही. ते म्हणाले, तुम्ही बोलला ना, ते रामबाण आहे. तुम्ही बोला. ते ऐकून मी त्या दिवसापासून सजग झालो. गुजरातच्या लोकांच्या मनात माझ्याबद्दलचा हा भाव बनला आहे, सर तुम्हाला एक शब्द बोलायचा आहे. याचा अर्थ मला आता जबाबदारीने वागलं पाहिजे. तेव्हापासून मी अधिक सजग आणि जबाबदार झालो. माझा प्रत्येक शब्द एक जबाबदारी आहे. माझा प्रत्येक शब्द हा एक गॅरंटी आहे, असे पंतप्रधानांनी सांगितलं.
त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार ?
तो शब्द बाकी लोक वापरत आहेत, त्याबद्दल मी काही बोलत नाही. पण मला सांगा, त्यांचे आजोबा, पणजोबा त्यांचे भाषण ऐका. ते गरीबीवर बोलायचे, त्यांची आजी गरीबीवर बोलायची. त्यांचे वडील गरिबीवर बोलायचे. त्यांची आई जेव्हा रिमोट सरकार चालवायची तेव्हाही गरीबीच्या गोष्टी करत होत्या. आता बोलत आहेत आम्ही एका झटक्यात गरीबी दूर करू. आम्ही फटाफट गरीबी दूर करू. कोण विश्वास ठेवणार? त्यात मोदीला काही बोलण्याची गरज नाही. मला त्यांच्यावर टीका करण्याचीही गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला. पण देश पाहत आहे. त्याच प्रकारे मी म्हटलं मी तुमच्यासाठी मेहनत करणार. त्यावर देशातील कोणताही व्यक्ती माझ्यावर अविश्वास ठेवणार नाही. पण इतर नेत्यांनी मी मेहनत करेल असं सांगितलं तर त्यांच्यावर किती भरोसा करतील, असा सवालही पंतप्रधान मोदींनी विचारला.
मी जेव्हा सांगतो तेव्हा मी करतो
देशातील कोणताही व्यक्ती माझ्यावर अविश्वास ठेवणार नाही. लोकांना सांगावं लागत नाही, लोकांनाच वाटतं मोदी करणार. कारण आपण पाहिलं आहे, मोदी मेहनत करतील हे लोकांना वाटतं. माझं जीवन, माझी वाणी आणि गॅरंटी हे एका सूत्रातून आलंय. ते हवेतून आलेलं नाही. मी जेव्हा सांगतो तेव्हा मी करतो, असं ते म्हणाले.
2014 मध्ये मी सांगितलं की गरिबांसाठी घरे बनवणार. मला अनेकांनी सांगितलं याला खूप पैसा लागेल. कसं करायचं ? असा प्रश्नही अनेकांना पडला. मी म्हटलं, बघा देशाच्या इकॉनॉमिचा ड्रायव्हिंग फोर्स बनेल. जेव्हा गरिबांचं घर बनवतो, तेव्हा वीट बनवणारा कमावतो, सिमेंट बनवणारा कमावतो, रोजगार मिळतो. फर्निचर बनवणारा कमावतो. मी देशाच्या इकॉनॉमिचा एक आराखडा तयार केला. चार कोटी घर बनवली, दिली. काही राज्यातील सरकारकडून थंड प्रतिसाद मिळाला. पण अपेक्षेनुसार एवढा कमी नव्हता. त्यानंतर मी पुन्हा घरे देणार म्हणून सांगितलं. बजेटमध्ये सांगितलं. पब्लिक मिटिंगमध्ये बोलतो. तुम्ही जेव्हा निवडणूक प्रचारात जाता तेव्हा माझं काम करा. तुम्ही गावात जाल तेव्हा काही अशी घरे असतील की त्यांना नल से जल योजनेचा लाभ मिळाला नसेल. कुणाला वीज मिळाली नसेल, कुणाला घर मिळाले नसेल त्यांची यादी मला पाठवा. कारण मी तीन कोटी घरे आणखी बनवणार आहे, ते फक्त त्यांच्यासाठी. म्हणजे पक्का रोडमॅप आहे. तेव्हा कुठे गॅरंटीला भरोसा मिळाला आहे, असे सूत्र पंतप्रधानांनी सांगितलं.