बंगळुरू : कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलला त्याच्याच गर्लफ्रेंडने पेटवून दिले. जखमी अवस्थेत पोलिसाला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला. संजय असे मृत व्यक्तीचे नाव असून राणी या होमगार्डसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. दोघेही बंगळुरू येथील बसवानगुडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
राणी संजयपासून काही दिवसांपासून दूर राहू लागली होती. संजयने दुसऱ्या व्यक्तीसोबत फोनवर बोलताना पाहिले. संजय राणीची समजूत घालण्यासाठी गेला असता दोघांमध्ये वाद झाला. तिने समेट करण्यास नकार दिल्यास स्वत:ला पेटवून घेण्याची धमकी संजयने दिली आणि त्यानंतर स्वत:वर पेट्रोल ओतून घेतले. त्याचवेळी राणीने माचिसची काडी पेटवली आणि त्याला पेटवून दिले. नंतर परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून राणीने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि संजयला दुचाकीवरून व्हिक्टोरिया रुग्णालयात नेले. मात्र गुरुवारी पहाटे संजयचा मृत्यू झाला.
संजयच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की राणीने त्याला जाणूनबुजून आग लावली, परिणामी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वतःचे कुटुंब असूनही संजयचे राणीसोबत संबंध होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.