पूजा खेडकरला जामीन मिळणार की नाही? उद्या होणार फैसला
पूजा खेडकरच्या अडचणी आता चांगल्याच वाढल्या आहेत. पूजाची उमेदवारीच रद्द करण्याचा निर्णय यूपीएससीने घेतला आहे. यूपीएससीने पूजा विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरला या प्रकरणात जामीन मिळणार की नाही याचा फैसला गुरुवारी होणार आहे.
महाराष्ट्र केडरच्या प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मिळणार की नाही यावर गुरुवारी फैसला होणार आहे. (IAS Pooja Kedkar Controversy). पूजाच्या याचिकेवर आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. आता गुरुवारी दुपारी चार वाजता न्यायालय निकाल देणार आहे. न्यायालयात झालेल्या युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी पूजा खेडकरच्या जामीन अर्जाला विरोध केला. पूजा खेडकरने पूर्ण जाणीव असताना देखील बनावट कागदपत्रे दाखल केली. यूपीएससीचे नियम स्पष्टपणे सांगतात की जर तुम्ही बनावट कागदपत्रे सादर केली तर तुमची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. तसेच गुन्हा देखील दाखल केला जाईल. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होणार आहे.
सरकारी वकील श्रीवास्तव म्हणाले की, केवळ तक्रार दाखल करणे कोणत्याही खटल्याचा आधार होऊ शकत नाही. एफआयआर दाखल केल्याने केस सुरू होत नाही.
न्यायालय- तपास पूर्ण होण्याची वाट पहा? सरकारी वकील- नाही सर. मी असे म्हणत नाही. कोर्ट- काय म्हणता? सरकारी वकील- प्रकरण असे आहे की पूजा खेडकरने माहिती लपवली, त्यामुळे तिला परीक्षेला बसण्यास अपात्र ठरवले जाऊ शकते. पूजा खेडकरने तिची भूमिका वारंवार बदलली आहे आणि त्यामुळे आम्हाला चौकशीसाठी तिची कोठडी हवी आहे. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास पूजा खेडकर सहकार्य करणार नाही. UPSC वकील नरेंद्र कौशिक पूजाचे नावच बदलले नाही तर तिच्या वडिलांचे नावही सातत्याने बदलले आहे, तिला तसे करण्याचा अधिकार आहे का? तिने आपल्या आईचे नावही बदलले आहे. अशा प्रकारे नावे बदलण्यात आली आहेत. – मनोरमा बुधवंत – मनोरमा जे बुधवंत – खेडकर मनोरमा दिलीपराव
पूजा खेडकरने संपूर्ण यंत्रणेची फसवणूक केली आहे. त्यामुळे प्रामाणिक उमेदवारांची संधी हिरावून घेतली गेली आहे. पूजा खेडकर यांनी दिशाभूल केल्याने त्यांच्यावर कारवाई होणे महत्त्वाचे आहे.
पूजा खेडकरवर आरोप काय?
पूजा खेडकरवर वय लपवण्याचे, खोटे अपंगत्व प्रमाणपत्र दाखल करणे आणि जातीबाबत खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या आरोप आहे. यूपीएससीची नोकरी मिळवण्यासाठी पूजाने ही बनावट कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामुळे पूजाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 2 ऑगस्टपर्यंत पूजाला या आरोपांवर उत्तर द्यायचे आहे. त्यामुळे भविष्यात ती आयएएस म्हणून काम करू शकणार की नाही हे तिच्या उत्तरावर अवलंबून असेल. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने पूजाला ही नोटीस पाठवलीये. 26 जुलै रोजी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली होती. पूजा खेडकर प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.