18 राज्यांमध्ये सत्ता, 400 खासदार, 1300 आमदार; तरीही मोदींचे कार्यकर्त्यांना नवे टारगेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जयपूरमधील भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना तुम्ही सतत कार्य करत रहा असा सल्ला मोदींनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आता भाजप (BJP) कार्यकर्त्यांना एक नवे टारगेट दिले आहे. तुम्ही जेव्हा भाजप कार्यकर्त्यांच्या भूमिकेत असता तेव्हा तुम्हाला शांत बसण्याचा अधिकार नसल्याचे मोदी (PM modi) यांनी म्हटले आहे. मोदी पुढे बोलताना म्हणाले की, तब्बल 18 राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे. सध्या स्थितीमध्ये भाजपाच्या एकूण आमदारांची संख्या 1,300 पेक्षाही अधिक असून, आपले चारशेपेक्षा अधिक खासदार आहेत. एवढं मोठ यश पाहून कोणीही म्हणेल की आता खूप झाले, ही वेळ आराम करण्याची आहे. मात्र असा विचार चुकीचा आहे. सध्या देश विकासाच्या वाटेवर निघाला आहे. देशाच्या विकासासोबतच तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहात या नात्याने काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना शांत बसण्याचा कोणताच अधिकार नाही. आपल्याला पुढील 25 वर्ष भाजपाचे हे यश टीकून ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्ही सतत काम करत रहा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे. ते शुक्रवारी जयपूरमध्ये आयोजीत भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला ऑनलाई संबोधन करताना बोलत होते.
प्रत्येक घरात भाजप, प्रत्येक गरिबाचे कल्याण
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, आपल्याला पुढील 25 वर्ष भाजपाला याच स्थरावर ठेवायचे आहे. यापेक्षा आणखी यश मिळवायचे आहे. त्यामुळे शांत बसून चालणार नाही. त्यासाठी सतत कार्य केले पाहिजे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर भाजपा, हर गरीब का कल्याण’चा नारा देखील दिला, मोदी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की, भाजप सरकार गरीबांसाठी विविध विकास योजना आणत आहे. तुम्ही प्रत्येक घरी जाऊन या योजनांची माहिती लोकांना द्या, त्याचा योग्य लाभ त्यांना मिळून द्या. केवळ निवडणूक आल्यानंतर मतदारांच्या घरी जाण्यात काहीही अर्थ नाही. आपल्याला भारताला अशा उंचीवर पोहोचवायचे आहे, जे स्वप्न भारत मातेला स्वतंत्र करताना स्वातंत्र्य सौनिकांनी पाहिले होते.
काँग्रेसवर निशाणा
दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. 2014 पूर्वी ज्यांची सत्ता होती. त्यांच्याकडून देशातील जनतेला अपेक्षा नव्हती. जनतेने अपेक्षा करणे सोडून दिले होते. मात्र 2014 ला भाजप सत्तेत येताच या परिस्थितीमध्ये बदल झाला. लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. याच अपेक्षा आपल्याला आता पूर्ण करायच्या आहेत. सक्षम आणि शक्तीशाली भारत घडवायचा असल्याचे यावेळी मोदींनी म्हटले आहे.