भोपाळ : भाजप नेत्या, खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात धक्कादायक विधान केलं आहे. विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेला मुलगा देशभक्त होऊच शकत नाही. हे राहुल गांधी यांनीही ठरवलं आहे. आम्हाला संसदेत बोलू दिलं जात नाही असं ते परदेशात जाऊन सांगतात. यापेक्षा लज्जास्पद काय असेल? मी राहुल गांधी यांचा निषेध करते. त्यांना देशाच्या बाहेर हाकलून दिलं पाहिजे, असं धक्कादायक विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
साध्वी प्रज्ञासिंह यांनी शनिवारी भोपाळ-दाहोद ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या देशभक्तीवरच सवाल केला. संसदेत चांगलं काम सुरू आहे. सर्व काही चांगलं होत आहे. मात्र काँग्रेसचे लोक संसद चालू देत नाहीये. त्यांचं अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आलं आहे, त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट होत चालली आहे. राहुल गांधी देशाचे नेते आहेत. तुम्हाला लोकांना निवडून दिलं आहे. तरीही तुम्ही परदेशात जाऊन देश आणि देशातील जनतेचा अपमान करत आहात?, असा सवाल साध्वी प्रज्ञासिंह यांनी केला.
तुम्ही भारताचे नाहीत हे आम्ही मान्य केलं आहे. कारण तुमची आई इटलीची आहे. परदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेला मुलगा कधीच देशभक्त होऊ शकत नाही. हे आम्ही सांगत नाही. तर चाणक्यानेच तसं लिहून ठेवलं आहे. चाणक्यांनी जे म्हटलंय तसंच राहुल गांधी वागत आहेत. इतके वर्ष तुमचं देशात सरकार होतं. तुम्ही देशाला पार पोखरून टाकलं होतं, अशी टीकाही त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी लंडन येथील हाऊस ऑफ पार्लियामेंटमध्ये ब्रिटिश खासदारांशी चर्चा केली होती. यावेळी त्यांनी मायक्रोफोनचा वापर केला. पण तो खराब होता. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले की, आमच्याकडचे माईक खराब नाहीत. आमच्याकडचे माईक सुरू आहेत. पण तुम्ही ते सुरू करू शकत नाहीत. जेव्हा खासदार म्हणून मी बोलायला लागतो तेव्हा माईक बंद केला जातो. असं अनेकवेळा घडलं आहे. भारतात विरोधी पक्षाचा आवाज दाबला जात आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते.