नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्ये (Congress) पुन्हा एकदा नेतृत्व बदलाच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यातच आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबातील व्यक्ती नको. गांधी कुटुंबा व्यतिरिक्त इतर कुणालाही अध्यक्ष करा, असा सल्ला प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसला दिला आहे. काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी प्रशांत किशोर यांनी अनेक सल्ले दिले आहेत. त्यापैकी गांधी कुटुंबातील व्यक्तीला पक्षाच्या अध्यक्षपदी बसवू नका असा प्रमुख सल्ला दिला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या यूपीएच्या अध्यक्षा राहू शकतात. राहुल गांधी (Rahul Gandhi) संसदेत पक्षाचं नेतृत्व करू शकतात. पण काँग्रेसचा अध्यक्ष गैर गांधी असावा, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिला आहे. इंडिया डिझव्हर्स बेटर सारखी मोहीम हाती घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेस प्रशांत किशोर यांचा सल्ला मानणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसला पुन्हा संजीवनी देण्यासाठी प्रशांत किशोर यांनी एक योजना तयार केली आहे. ती नटराजपासून प्रेरित आहे. नटराज भगवान महादेवाचं रुप आहे. त्याला ब्रह्मांडाचा निर्माताही म्हटलं जातं. संरक्षक आणि संहारक म्हणूनही पाहिलं जातं. स्वत:ला पुन्हा उभं करण्यासाठी काँग्रेसने सहा मुलभूत संकल्प केले पाहिजे, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आता लोकशाहीवादी संघटना राहिलेली नाही, असं स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. 65 टक्के जिल्हा अध्यक्ष आणि 90 टक्के ब्लॉक अध्यक्षांची काँग्रेसचे अध्यक्ष किंवा महासचिवांसोबत कोणतीही बैठक झाली नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
गेल्या 25 वर्षात काँग्रेसकडे राष्ट्रीय स्तरावर कोणतंही सदस्यता अभियान नव्हतं, असं सांगत काँग्रेसमध्ये तरुणांचा भरणा करण्याचे संकेतही प्रशांत किशोर यांनी दिले आहेत. 66 सीडब्ल्यूसी सदस्यांमध्ये केवळ दोन सदस्यच 45 वर्षाच्या आतले आहेत, हे सुद्धा त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. काँग्रेसचा ढाचा तोच राहील. पण काँग्रेसचा अवतार नवा राहील. काँग्रेसमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी पंचसूत्री कार्यक्रमही दिला आहे. आघाडीचा मुद्दा सोडवल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाचा मुद्दा सोडवण्याची गरज पडेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसच्या स्थापनेच्या काळातील जे सिद्धांत होते. त्याची अंमलबजावणी करावी लागेल. तरच काँग्रेसचं पुनरुज्जीवन होईल. तसेच ग्रासरूटला कार्यकर्त्यांची फौज तयार करावी लागेल. प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सल्ल्यांमध्ये मीडिया आणि डिजीटल प्रचाराचाही समावेश आहे. मोदी आणि भाजपचा पराभव करायचा असेल काँग्रेसने एक शॅडो कॅबिनेट स्थापन केली पाहिजे. त्यात सक्षम नेते असावेत असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला यूपीए-3ची निर्मिती करण्याचा किंवा काँग्रेस प्लस म्हणजे आघाडीचा विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. ज्या प्रादेशिक पक्षांनी राज्यांमध्ये आपलं मजबूत स्थान निर्माण केलं आहे, अशा प्रादेशिक पक्षांसोबत युती करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. एक कुटुंब एक तिकीट, काँग्रेस अध्यक्ष, काँग्रेस कार्य समितीचा निश्चित कार्यकाळ आणि अंतर्गत निवडणुकांमधील हेराफेरी रोखणे आदी गोष्टींचा या शिफारशीत समावेस आहे. काँग्रेसने एक कोटी कार्यकर्त्यांशी संपर्क करावा, त्यात ग्रासरुटला काम करणारे 50 लाख कार्यकर्ते असतील तर बाकी इतर कार्यकर्ते निवडणुकीसाठी काम करणारे असतील, असा सल्लाही देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या: