राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया शरद पवार यांचीच; देवेंद्र फडणवीस यांनी बॉम्बच टाकला

| Updated on: Oct 04, 2023 | 3:04 PM

2019मध्ये शिवसेनेने भाजपसोबत युती करण्यास नकार दिला. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू केली. त्याचवेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. या खेळीमागे कोण होतं?

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया शरद पवार यांचीच; देवेंद्र फडणवीस यांनी बॉम्बच टाकला
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी होण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे या राष्ट्रपती राजवटीमागची खेळी भाजपचीच असल्याचं बोललं जात होतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अप्रत्यक्षपणे भाजपवर राष्ट्रपती राजवटीचं खापर फोडलं होतं. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. फडणवीस यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात 2019मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया ही शरद पवार यांचीच होती. 2019मध्ये शिवसेनेने आम्हाला धोका दिला होता. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली होती. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आमच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवला. आम्हाला तीन पक्षाचं सरकार नकोय. आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो, असा हा प्रस्ताव होता, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

दादा आणि माझ्यावर जबाबदारी

त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी आम्ही भाजपसोबत येणार असल्याचं सांगितलं. दोन्ही पक्ष एकत्र आणण्याची जबाबदारी माझ्यावर आणि अजित पवार यांच्यावर टाकण्यात आली. आम्ही आमदार, मंत्र्यांचे पोर्टफोलिओ तयार केले. जिल्ह्यांपासूनच्या सर्व गोष्टी ठरवलं. या प्रक्रियेच्या काळातच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं ठरलं. त्यानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली. पण त्यानंतर शरद पवार यांनी त्यांचा निर्णय बदलला. हे योग्य नसल्याचं अजित पवार यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला होता, असं फडणवीस म्हणाले.

पवारांसोबत डील

2019मध्ये जी डील झाली होती. ती अजित पवार यांच्यासोबत झाली नव्हती. तर ती शरद पवार यांच्यासोबत झाली होती. शरद पवार यांच्यासोबत चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला होते. त्यांनी संमती दिल्यानंतरच आम्ही अजित पवार यांच्यासोबत चर्चा करायला बसलो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आयडिया पवारांचीच

शरद पवार नवनव्या गोष्टी सांगत असतात. पण महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय शरद पवार यांचाच होता हे सत्य आहे. मी इतक्या लवकर यूटर्न घेणार नाही. तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू करा. राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करेन. त्यानंतर भूमिका घेईन. महाराष्ट्राला स्थिर सरकार हवं आहे. आम्ही भाजपच्यासोबतच आहोत, असं शरद पवार म्हणाल्याचा दावाही त्यांनी केला.

लेटर माझ्या घरी टाईप

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना सरकार बनवण्यासाठी आमंत्रण दिलं जातं. त्यांना तसं पत्र दिलं जातं. तसंच पत्र राष्ट्रवादीलाही दिलं होतं. आम्ही सरकार बनवणार नाही, असं लेटर राष्ट्रवादीने आमच्या घरी टाईप केलं होतं. त्यानंतरच राष्ट्रपती राजवट लागू केली गेली, असंही त्यांनी स्पष्ट केलं.