“मी माणूस आहे, देव नाही, चुका माझ्याकडूनही होतात”; नरेंद्र मोदी यांची पहिल्याच पॉडकास्टमध्ये ‘मन की बात’!
निखिल कामतने त्यांना जर एखाद्या तरुणाला राजकारणात यायचं असेल तर त्याच्यात असे काय गुण असायला हवेत, असं तुम्हाला वाटतं, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.
PM Narendra Modi Podcast : झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत घेतली. ही मुलाखत पॉडकास्ट स्वरुपाची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही मुलाखत पॉडकास्ट स्वरुपातील पहिलीच मुलाखत आहे. आता नुकतंच या मुलाखतीचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भाष्य करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी मी माणूस आहे, देव नाही, चुका माझ्याकडूनही होतात, असे विधान केले.
निखिल कामत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्रेलर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी People with The Prime Minister Shri Narendra Modi असे म्हटले आहे. या व्हिडीओत निखिल कामत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न विचारत आहेत. त्यावर मोदीही त्यांना फारच मोकळेपणाने उत्तर देताना दिसत आहेत. यावेळी निखिल कामतने त्यांना जर एखाद्या तरुणाला राजकारणात यायचं असेल तर त्याच्यात असे काय गुण असायला हवेत, असं तुम्हाला वाटतं, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.
“चुका सर्वांकडून होतात”
“राजकारणात कायमच चांगल्या लोकांनी यायला हवं. राजकीय क्षेत्रात येताना महत्त्वाकांक्षा घेऊन येण्यापेक्षा एखादे ध्येय घेऊन यावे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो होतो, तेव्हा मी एक भाषण केले होते. त्यावेळी मी पहिल्यांदा सार्वजनिकरित्या म्हटले होते की, चुका या सर्वांकडून होतात. माझ्याकडूनही चुका होतात. मी माणूस आहे, देव नाही”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
People with The Prime Minister Shri Narendra Modi | Ep 6 Trailer@narendramodi pic.twitter.com/Vm3IXKPiDR
— Nikhil Kamath (@nikhilkamathcio) January 9, 2025
“मी शांततेच्या बाजूने”
यानंतर नरेंद्र मोदी यांना निखिल कामत यांनी जगभरात सुरु असलेल्या युद्धांबद्दल विचारणा केली. “सध्या जगभरात काही ठिकाणी युद्ध सुरु आहेत, मग या युद्धाची चिंता आम्ही करावी का?”, असा प्रश्न निखिल कामत यांनी विचारला. त्यावर ते म्हणाले “जगभरात जे युद्ध सुरु आहेत त्यात मी तटस्थ नसल्याचे सातत्याने म्हटले आहे. मी शांततेच्या बाजूने आहे, असं सतत सांगितले आहे”, असेही मोदींनी म्हटले.