नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 रुपयाचं नाणं आणणार, काय आहे त्याचं वैशिष्ट्यं
पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाच्या भव्य इमारतीचं 28 मे रोजी वेद मंत्रांच्या उद्घोषात उद्घाटन करतील. त्याच वेळी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 75 रुपयाचं नवं नाणं जारी करण्यात येईल.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी 28 मे रोजी नवीन संसदेच्या इमारतीचं उद्घाटन होत आहे. या सोहळ्याला कॉंग्रेससह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर एनडीए आणि एनडीएचे घटक पक्ष नसलेल्या इतर अनेक पक्षांनी या सोहळ्याला हजर राहण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नव्या संसद भवन इमारतीच्या उद्धाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 रुपयाचं नवं नाणं जारी करणार आहेत. हे आतापर्यंतचं सर्वात महागडं नाणं असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाच्या भव्य इमारतीचं 28 मे रोजी वेद मंत्रांच्या उद्घोषात उद्घाटन करतील. त्याच वेळी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 75 रुपयाचं नवं नाणं जारी करण्यात येईल. या नाण्यावर नव्या संसद भवनाचं चित्र असेल. संसद भवनाच्या इमारतीच्या चित्राखाली साल 2023 देखील लिहीलेलं असेल. यात नाण्यावर हिंदी आणि इंग्रजीत संसद संकुल आणि parliament complex लिहीलेलं असेल. तसेच हिंदीत भारत आणि इंग्रजीत इंडीया लिहीलेलं असेल. तसेच अशोक चिन्हं देखील असेल.
काय आहेत या नाण्याची वैशिष्ट्यं पाहूयात…
या नाण्याचं वजन 35 ग्राम असेल, हे नाणं 50 टक्के चांदी, 40 टक्के कॉपर, पाच-पाच टक्के निकेल आणि झिंक धातूच्या मिश्रणापासून तयार झालेलं असेल. नाण्याच्या किनारी गोलाकार नक्षी असेल. नवीन संसद भवनाचं उद्घाटन वेद मंत्रोच्चारात रविवारी होईल. यावेळी चौल सामाज्राचे प्रतिक असलेला राजदंड सेन्गोल नवीन संसद भवनाच्या लोकसभा अध्यक्षाच्या आसनाजवळ स्थापित केला जाईल.
बहिष्कारापेक्षा पाठींबा देणारे जास्त
काँग्रेस, आम आदमी पार्टी, डावे, तृणमूल आणि समाजवादी पक्ष अशा 19 पक्षांनी नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. तर एनडीए आणि एनडीए बाहेरील 25 पक्षांनी पाठींबा देखील दर्शविला आहे.