नवी दिल्ली – तुम्हाला वाचून हे आश्चर्य वाटेल पण तुरुंगात जाण्यापूर्वी एका कैद्याने (Prisoner)पैसे कमावण्यासाठी केलेली एक आयडिया त्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिहार जेलमध्ये (Tihar Jail) एका कैद्याच्या पोटातून डॉक्टरांनी दोन मोबाईल (mobile in stomach)बाहेर काढले आहेत. त्याच्या पोटात अजून दोन मोबाईल शिल्लक आहेत, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली आहे. त्याच्या पोटात एकूण चार मोबाील असल्याची माहिती या कैद्याने जेलमधील पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे.
जेलमधील पोलीस अधिकाऱ्यांना कैद्याने सुरुवातीला जेव्हा हे सांगितले, तेव्हा अधिकारी त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. कैदी ऐकण्यास तयार नव्हता, त्यामुळे मग त्याला हॉस्पिटलला पाठवण्यात आले. डॉक्टरांनी त्याची एंडोस्कोपी केली तर कैदी खरे बोलत असल्याचे समोर आले. त्यानंतर डॉक्टरांनी सर्जरी करुन दोन मोबाईल बाहेर काढले आहेत. डॉक्टरांना आणखी दोन मोबाईल बाहेर काढता आलेले नाहीत. त्यासाठी आणखी एक ऑपरेशन करावे लागमार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
तिहार जेलचे डीजी संदीप गोयल यांनी सांगितले आहे की हा कैदी जेल मंबर एकमध्ये कैद आहे. त्याच्या कोणत्यातरी गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे. नुकताच तो पॅरोलवर जेलच्या बाहेर गेला होता. पॅरोल संपल्यानंतर पुन्हा जेलमध्ये येण्यापूर्वी जेलमध्ये पैसे कमवण्याची आयडिया त्याच्या डोक्यात आली. त्यासाठी या कैद्याने जेलमध्ये परतण्याच्या पूर्वी पाच सेटिंमीटरचे चार फोन गिळले होते. अधिकाऱ्यांपासून वाचवून हे फोन जेलमध्ये विकण्याचा त्याचा प्लॅन होता. हा कैदी जेव्हा प२रोल संपल्यानंतर जेलमध्ये आला तेव्हा सुरक्षा रक्षकांना त्याच्या या प्लॅनची काहीच कल्पना नव्हती.
हा कैदी जेलमध्ये परतल्यानंतर पहिलया दोन तीन दिवसांत हे मोबाईल बाहेर काढण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला यश मिळू शकले नाही. याच काळात त्याच्या पोटात दुखू लागले. आता या मोबाईलमुळे आपला जीव जाईल, ही भीती वाटल्याने त्याने ही माहिती अधिकाऱ्यांना दिली.
सुरुवातीला हा कैदी जे सांगत होता, त्याच्यावर विश्वास ठेवण्यास अधिकारी तयार नव्हते. तो पोलिसांची मजा घेत आहे, असे सुरुवातीला सगळ्यांना वाटत होते. तिहारमध्ये फोन पकडल्यानंतर एखादा फोन गिळून घेतल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र चार फोन एकदम गिळले असतील, यावर अधिकाऱ्यांचा विश्वास बसत नव्हता. मात्र हा कैदी त्याच्या चार फोन गिळले, यावर अडून बसला होता. म्हणून त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्याला दीनदयाळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर अंडिस्कोपीत त्याच्या पोटामध्ये एकपेक्षा जास्त फोन असल्याचे स्पष्ट झाले. आता दोन फोन बाहेर काढण्यात आले असले तरी अजून दोन फोन मात्र त्याच्या पोटातच आहेत.