PM Security Breach: एवढ्याशा घटनेचा राईचा पर्वत केला जातोय; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं विधान
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीवरून वाद वाढलेला असतानाच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी मोठं विधान केलं आहे. एवढ्याशा घटनेचा राईचा पर्वत केला जात आहे.
चंदीगड: पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीवरून वाद वाढलेला असतानाच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी मोठं विधान केलं आहे. एवढ्याशा घटनेचा राईचा पर्वत केला जात आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत काहीही धोका नव्हता. मोदींच्या रॅलीला गर्दी नव्हती. त्यावरून लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेवटच्या क्षणी पंतप्रधानांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला. त्यांना हेलिकॉप्टरने जायचं होतं. पण त्यांनी अचानक रस्ते मार्गे जाण्याचा निर्णय घेतला. यात पोलिसांची काहीच चूक नाही. ज्या ठिकाणी आंदोलक रास्ता रोको करत होते, त्या रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावरच मोदींचा ताफा रोखण्यात आला. त्यात धोका आला कुठून? असा सवाल चन्नी यांनी केला.
इंटेलिजन्स ब्युरो आणि एसपीजीचं अपयश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहणं हे इंटेलिजन्स ब्युरो आणि एसपीजीचं अपयश आहे. आयबी डायरेक्टर यांनी मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षेचा आढावा घेतला होता. तेही या व्यवस्थेवर समाधानी होते. मात्र अचानक सकाळी जवळच्या 10 ते 12 गावातील लोकांनी रास्ता रोको केला. त्यामुळे अडथळा निर्माण झाला. ज्या परिसरातून मोदींना जायचं आहे. तो भाग असाही बीएसएफच्या अधिकार क्षेत्रातच येतो. त्यामुळे त्यात राज्य पोलीस दलाची काहीच चूक नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एवढ्या मोठ्या नेत्यानं असं करू नये
फिरोजपूर येथे भाजपची रॅली होती. मोदी त्यासाठीच येणार होते. पण 70 हजार खुर्च्यांच्या जागी केवळ 700 खुर्च्याच भरल्याचं मोदींना कळलं तेव्हा त्यांनी माघारी फिरणंच योग्य समजलं. त्यानंतर त्यांनी आपल्या अपयशाचं खापर सुरक्षा यंत्रणेवर फोडलं. इतक्या मोठ्या राजकीय नेत्याने असं करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
सोनिया गांधींनी घेतला आढावा
दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चरणजीतसिंग चन्नी यांच्याशी संपर्क साधून मोदींच्या दौऱ्याबाबतच्या प्रकरणाची माहिती घेतली. तसेच मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या सुरक्षेत त्रुटी राहता कामा नये, असा सल्लाही सोनिया गांधी यांनी चन्नी यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 6 January 2022https://t.co/n5auhcslqG#corona | #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 6, 2022
संबंधित बातम्या:
PM Security Breach: 500 शेतकरी मरण पावले, त्यासाठी कुणाला फासावर लटकवायचे?; राऊतांचा सवाल
PM Security Breach | काय असते एसपीजीची Blue Book? जिच्याकडे दुर्लक्ष केल्याचं गृहमंत्रालय म्हणतंय!