चंदिगड : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे पडसाद आता पंजाबमधील महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकींमध्ये बघायला मिळत आहे. पंजाबमध्ये 14 फेब्रुवारी रोजी आठ नगरपालिका, 109 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. या निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठा झटका बसताना दिसत आहे. विशेष म्हणजे भाजप खासदार सनी देओल यांच्या मतदारसंघात असलेल्या सर्व 29 जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. या सर्व जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे (BJP lost all 29 seats in Gurdaspur Sunny Deol parliamentary constituency).
काँग्रेस आघाडीवर
शेतकरी आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत, अशी भूमिका मांडली होती. याशिवाय संसदेच्या अधिवेशनातही त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. त्यामुळे पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं दिसत आहे (BJP lost all 29 seats in Gurdaspur Sunny Deol parliamentary constituency).
गुरदासपूरच्या नागरिकांनी सनी देओलच्या भाजपला नाकारलं
सनी देओल यांच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीत याच गुरदासपूरच्या नागरिकांनी सनी देओलला मोठ्या अभिमानाने निवडून दिलं होतं. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. सनी देओल यांच्या मतदारसंघात सर्व 29 जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसने सर्व जागांवर विजय मिळवला आहे.
भाजपला अनेक ठिकाणी एकही जागा नाही
पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव होत असल्याचं मतमोजनीच्या आकडेवारीतून समोर येताना दिसत आहे. अनेक महापालिका, नगरपंचायतींमध्ये भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आलं नाही.
कपूरथला नगरपालिकेत काँग्रेसला 44 जागांवर विजय मिळाला आहे. त्याचबरोबर अकाली दलाला तीन, तर दोन अपक्ष निवडून आले आहेत. एका वॉर्डात दोन उमेदवारांना समसमान मतं मिळाली आहे. या नगरपालिकेत भाजप आणि आम आदमी पक्षाला एकही जागेवर विजय मिळालेला नाही. जालंधरमध्येही भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय. फिल्लौर नगरपरिषदेत काँग्रेसने 14 पैकी 11 जागांवर विजय मिळवला. तर भाजप आणि शिरोमणी अकाली दलाला एकाही जागावर यश आलं नाही.
मोगा येथे देखील भाजपला खातं उघडता आलेलं नाही. मात्र, इथे शिरोमणी अकाली दल काँग्रेसच्या पुढे आहे. अकाली दलाला 15 तर काँग्रेसला 13 जागांवर विजय मिळाला आहे.
हेही वाचा : ‘खून, बलात्कार होतातच, गुंड जेलमधून सुटल्यावर मिरवणूक काढतात, सरकार अस्तित्वहीन झालंय’