राहुल गांधी अजून परिपक्व नाहीत; प्रणव मुखर्जी यांच्या ‘त्या’ उल्लेखाने खळबळ
'प्रणव, माय फादर : ए डॉटर रिमेम्बर्स' हे पुस्तक सध्या चांगलंच गाजत आहे. माजी राष्ट्रपती आणि दिवंगत काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेपासून ते प्रणव मुखर्जी यांच्या पंतप्रधानपदाच्या इच्छेपर्यंतच्या गोष्टींवर या पुस्तकात भाष्य करण्यात आलं आहे. तसेच या पुस्तकातून अनेक आठवणींनाही उजाळा देण्यात आला आहे.
नवी दिल्ली | 7 डिसेंबर 2023 : माजी राष्ट्रपती आणि दिग्गज काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांच्या मुलीच्या पुस्तकाने खळबळ उडाली आहे. या पुस्तकात प्रणव मुखर्जी यांची मते, भूमिका आणि निरीक्षणे मांडण्यात आली आहेत. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबतचं प्रणव मुखर्जी यांचं मतही मांडण्यात आलं आहे. राहुल गांधी हे अपरिपक्व राजकारणी असल्याचं प्रणव मुखर्जी यांचं मत होतं, असं त्यांच्या मुलीने म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांचं कार्यालय एएम आणि पीएममधील फरक समजू शकत नाही. ते पीएमओ काय सांभाळणार? असा सवालही प्रणवदा यांनी केला होता, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांचं हे पुस्तक आहे. ‘प्रणव, माय फादर : ए डॉटर रिमेम्बर्स’ असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकात राहुल गांधी यांचे विचार आणि त्यांच्या नेतृत्व कौशल्यावर भाष्य करण्यात आलं आहे. राहुल गांधी हे विनम्र आहेत. पण त्यांना अनेक प्रश्न पडलेले असतात. ते राजकीय दृष्ट्या अजून परिपक्व नाहीयेत, असं मला माझ्या वडिलांनी एकदा सांगितलं होतं. या पुस्तकात राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचा एक किस्साही सांगण्यात आला आहे.
पीएमओ कसे सांभाळतील
एका सकाळी राहुल गांधी माझ्या वडिलांना भेटायला आले. माझे वडील रोज सकाळी मुघल गार्डनमध्ये फेरफटका मारायचे. सकाळी फेरफटका मारताना आणि पूजेच्यावेळी कोणी व्यत्यय आणलेला त्यांना चालत नसे. तरीही त्यांनी राहुल गांधी यांना भेटण्याचा निर्णय घेतला. माहिती घेतली तेव्हा राहुल गांधी हे संध्याकाळी भेटायला येणार असल्याचं समजलं होतं. पण राहुल गांधी यांच्या कार्यालयाकडून त्यांना चुकीने सकाळी ही भेट असल्याचं सांगितलं गेलं. मला एका एडीसी मार्फत या घटनेची माहिती मिळाली. त्यावर मी वडिलांना याबाबत विचारलं. तेव्हा त्यांनी उपहासात्मक टिप्पणी केली. राहुल गांधी यांचं कार्यालय एएम आणि पीएममधील फरक समजत नसेल तर ते एक दिवस पीएमओ कसे सांभाळतील?, असा सवाल प्रणवदांनी केला होता, असं या पुस्तकात शर्मिष्ठा यांनी लिहिलंय.
लगेच दुसऱ्या विषयावर जातात
या पुस्तकात प्रणव मुखर्जी यांच्या डायरीतील काही माहितीही दिली आहे. राहुल गांधी यांना शासनातील प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मंत्रिमंडळात सामील होण्याचा सल्ला प्रणव मुखर्जी यांनी दिला होता, असा उल्लेखही या पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकात राहुल गांधी यांच्याबाबत फारसं लिहिण्यात आलेलं नाही. 25 मार्च 2013च्या दौऱ्यातील एक किस्सा देण्यात आला आहे. यावेळी राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना प्रणव मुखर्जी यांनी त्यांचं मत मांडलं होतं. राहुल गांधी नम्र आहेत. विविध विषयात त्यांचा रस आहे. पण एका विषयावरून दुसऱ्या विषयात ते वेगाने जातात. ते किती ऐकतात आणि किती आत्मसात करतात. ते अजूनही राजकीयदृष्ट्या परिपक्व झालेले नाहीत, असं प्रणवदा यांनी म्हटल्यांचं शर्मिष्ठा यांनी लिहिलंय.
पंतप्रधान व्हायचं होतं
शर्मिष्ठा यांनी या पुस्तकात एका घटनेचा उल्लेखही केला आहे. यात राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर आणि पंतप्रधानपद सांभाळण्याच्या क्षमेतवरही सवाल केले आहेत. तसेच या पुस्तकात वडिलांसोबतच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला आहे. याशिवाय प्रणवदा यांना पंतप्रधान बनायचे होते. तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, असंही म्हटलं आहे.