Rahul Gandhi : सारी दुनिया का बोझ हम… राहुल गांधी बनले कुली, डोक्यावर सुटकेस; कारण काय?
काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने सामान्य लोकांना भेटत असतात. त्यांची विचारपूस करत असतात. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारत असतात. काही लोकांना तर घरी बोलावून त्यांच्याशी जेवणही करतात. आता ते पुन्हा एका गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत.
नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : अंगात लालभडक शर्ट, त्यावर बिल्ला आणि डोक्यावर सुटकेसचा बोझ… कुलींचा हा लूक तुम्ही पाहिला असेलच. आता तुम्ही म्हणाल यात नवं काय? पण हाच लूक पाहून काही प्रवासी आज दचकले. कारण या लूकमध्ये एखादी कुली नव्हता. तर देशातील बडे नेते आणि सर्वात जुन्या पक्षाचे खासदार राहुल गांधी होते. राहुल गांधी यांचा हा अनोखा लूक पाहून भल्याभल्यांना आश्चर्य वाटलं. अन् राहुल गांधी कुलीच्या वेशात काय करतात असा प्रश्नही त्यांना पडला. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेलच ना… चला तर मग जाणून घेऊया स्टोरी मागची स्टोरी.
राहुल गांधी आज सकाळीच आनंद विहार रेल्वे स्थानकावर आले होते. यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या कुलींशी चर्चा केली. त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांना होणारी मिळकत, त्यातून त्यांचं भागतं का आदी माहितीही त्यांनी घेतली. तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे याची विचारणाही त्यांनी केली. काही कुलींनी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचला आणि राहुल यांनी या कुलींना भेटण्याचा प्लानच तयार केला.
कुलींशी मनसोक्त गप्पा
राहुल गांधी यांनी या कुलींशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यांच्यासोबत सेल्फीही काढला. त्यानंतर राहुल गांधी यांनी कुलींनी दिलेला त्यांचा गणवेश घातला. डोक्यावर सुटकेसही घेतली. काही काळ रेल्वे स्टेशनवर दिसले. राहुल गांधी यांचा हा कुलींच्या वेशातील फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.
समस्या सोडवणार
यावेळी एका कुलीने मीडियाशी संवाद साधताना प्रचंड आनंद व्यक्त केला. राहुल गांधी यांनी कुली आणि रिक्षा चालकांशी चर्चा केली याचा आम्हाला आनंद वाटतो. त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. त्या सरकारच्या समोर मांडण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तसेच या समस्या सोडवण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितल्याचंही या व्यक्तीने सांगितलं.
भारत जोडो यात्रेवर
राहुल गांधी हे चांगले व्यक्ती आहेत. गरीबांना भेटत असतात, असं आणखी एका कुलीने साांगितलं. काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेवर आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते आनंद विहार रेल्वे स्थानकावर आज पोहोचले.
आधीही कुलींना भेटले
राहुल गांधी यांनी यापूर्वीही कुलींची भेट घेतली होती. गेल्या आठवड्यात उदयपूरला काँग्रेसचं चिंतन शिबीर होतं. तिकडे ते गेले होते. त्यावेळी कुली असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेतली होती. तसेही राहुल गांधी सामान्य लोकांना वरचेवर भेटत असतात. त्यांच्याशी गप्पा मारतात. मध्यंतरी त्यांनी एका भाजी विक्रेत्याला त्याच्या पत्नीसह घरी बोलावलं होतं. त्यांच्यासोबत घरी जेवण करताना मनसोक्त गप्पाही मारल्या होत्या.