Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी गांधी घराण्याचा एक मोठा निर्णय
Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी गांधी घराण्याने एक मोठा निर्णय घेतलाय. आज लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल. देशात NDA विरुद्ध INDIA आघाडी असा सामना आहे. यात सध्या एनडीएची बाजू वरचढ आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हा निर्णय घेतलाय.
नवी दिल्ली : सध्या देशातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. सर्वच पक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी करत आहेत. कुठला उमेदवार, कुठल्या जागेवरुन निवडणूक लढवणार त्याची घोषणा होत आहे. आज शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल. त्याआधी गांधी कुटुंबाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेठी आणि रायबरेली या हक्काच्या पारंपारिक मतदारसंघापासून गांधी कुटुंब लांब राहणार आहे. या दोन्ही मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे. राहुल आणि प्रियंका गांधी दोघांनी अमेठी आणि रायबरेली येथून निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं म्हणणं असं आहे की, “मी जर अमेठी आणि वायनाड या दोन्ही जागांवरुन लोकसभेची निवडणूक लढवली, या दोन्ही ठिकाणहून निवडणूक जिंकल्यास एकजागा सोडावी लागेल. यातून लोकांमध्ये चुकीचा संदेश होईल” “अमेठी सोडल्यास लोक म्हणतील, यावेळी विजयी केलं, तर आम्हाला सोडून जातोय आणि वायनाड सोडल्यास लोक म्हणतील अमेठीमधून हरल्यानंतर आम्ही संसदेत पाठवलं, तर आता अमेठीमधून जिंकल्यानंतर आम्हाला सोडून दिलं” म्हणून राहुल गांधी वायनाडमधूनच निवडणूक लढणार आहेत.
….तर जनतेमध्ये चुकीचा संदेश दिला
दुसऱ्याबाजूला प्रियंका गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिलाय. रायबरेलीच नाही, दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघातून त्या निवडणूक लढणार नाहीयत. प्रियंका गांधी असं म्हणतात, एकाच कुटुंबातील तीन सदस्य संसदेत गेले, तर जनतेमध्ये चुकीचा संदेश दिला जाईल तसच भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र परिवारवादाचा आरोप लावतात. त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यांचे आरोप योग्य ठरतील.
काँग्रेससमोर निर्माण झाली अडचण
राहुल गांधी बहिण प्रियंका गांधीशी सहमत आहेत. दोन्ही भावंडांनी अमेठी आणि रायबरेली येथून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. आता काँग्रेससमोर ही अडचण आहे की, या दोन परंपराग मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची?. 2019 लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी या रायबरेलीमधून जिंकल्या होत्या. पण अमेठीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा पराभव झाला. भाजपाच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना पराभूत केलं होतं. राहुल गांधी त्यावेळी वायनाड येथून जिंकले होते.