राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच साधला नितीश कुमार यांच्यावर निशाणा; राजभवनावरचा सांगितला तो किस्सा
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भूमिकेवरून काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. जयराम रमेश यांनी त्यांना 'रंग बदलणारा सरडा' असे म्हटले होते. मात्र, राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच नितीश कुमार यांच्याबाबत वक्तव्य केले आहे.
पाटणा | 1 फेब्रुवारी 2024 : इंडिया आघाडीची मोट बांधणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अचानक यू टर्न घेतला. लालूप्रसाद यादव यांच्यापक्षासोबत असलेली युती तोडून नितीशकुमार यांनी भाजपच्या मदतीने राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले. हा इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. नितीशकुमार यांच्या या भूमिकेवरून राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच थेट भाष्य केले आहे. नितीशकुमार यांच्यावर टीका करताना राजभवनावर घडलेला एक किस्साही सांगितला. तर, अशा लोकांची गरज नाही असे म्हणत राहुल गांधी यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बाजू बदलली आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्या या भूमिकेवरून काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. जयराम रमेश यांनी त्यांना ‘रंग बदलणारा सरडा’ असे म्हटले होते. मात्र, राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच नितीश कुमार यांच्याबाबत वक्तव्य केले आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमध्ये दाखल झाली. या यात्रेदरम्यान लोकांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, त्यांच्यावर थोडे दडपण आले होते. त्यांनी (नितीश कुमार) पाठ फिरवली. पण आम्हाला अशा लोकांची गरज नाही असा टोला त्यांनी लगावला.
नितीशकुमार यांच्यासारख्या थोड्याशा दडपणावर यू टर्न घेणाऱ्या लोकांची मला गरज नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली. यावेळी राहुल गांधी यांनी राजभवन येथे घडलेला एका किस्साही सांगितला. हा किस्सा त्यांना भूपेश बघेल यांनी सांगितल्याचे ते म्हणाले.
तुमच्या मुख्यमंत्र्यांनी (नितीशकुमार) राज्यपाल यांच्यासमोर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्र्यांनीही शपथ घेतली. टाळ्यांचा कडकडाट झाला. यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. कारमध्ये त्यांच्या लक्षात आले की त्यांची शाल राजभवनातच राहिली. त्यांनी चालकाला पुन्हा राजभवन येथे जाण्यास सांगितले. राज्यपालांकडे पोहोचल्यावर त्यांनी विचारले, ‘अरे, इतक्या लवकर परत आलात का?’ बिहारमध्ये अशी परिस्थिती सुरु आहे असा टोला राहुल गांधी यांनी नितीशकुमार यांना लगावला.