नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. विधीवत पूजा करत, मंत्रोच्चारात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यावर देशातील 21 महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी विरोध केला होता. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवं होतं, असं विरोधकांचं म्हणणं आहे. राष्ट्रपती या सर्वोच्च असल्याने त्यांच्या हस्तेच नव्या संसदेचं उद्घाटन व्हायला हवं होतं. तसेच राष्ट्रपती या महिला असल्याने महिलेला संसदेचं लोकार्पण करण्याचा सर्वोच्च मान मिळाला असता. त्यातून चांगला संदेशही गेला असता, असं विरोधकांचं म्हणणं होतं. विरोधानंतरही मोदी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून टीका केली आहे. संसद ही जनतेची आवाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनीच सर्वात आधी मोदींच्या हस्ते संसदेच्या उद्घाटनाला विरोध केला होता. पंतप्रधानांच्या नव्हे तर राष्ट्रपतीच्या हस्ते नव्या संसदेचं उद्घाटन झालं पाहिजे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या या भूमिकेला देशातील 21 पक्षांनी पाठिंबा दिला होता.
नव्या संसद भवनाचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. भारताच्या नव्या संसदेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. आपलं हृदय, मेंदू आशा आणि अभिमानाने भरलेलं आहे. ही प्रतिष्ठीत इमारत सशक्तिकरणाचं उगमस्थान होवो, स्वप्नांना धुमारे फुटो आणि त्याचं वास्तवात रुपांतरीत होवो. यामुळे आपला महान देश प्रगतीचं उंच शिखर गाठो, असं मोदींनी म्हटलं आहे. मोदींनी सोबत कार्यक्रमाचे फोटोही पोस्ट केले आहेत.
संसद लोगों की आवाज़ है!
प्रधानमंत्री संसद भवन के उद्घाटन को राज्याभिषेक समझ रहे हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 28, 2023
आज सकाळी सव्वा सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा विधी करण्यात आला. यावेळी हवन करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती साधूसंतांनी सेंगोल दिला. पंतप्रधानांनी हा सेंगोल लोकसभेत लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला ठेवला. त्यानंतर त्यांनी सर्व साधू संतांना नमस्कार केला. नंतर मोदी यांच्या हस्ते संसदेचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर मोदींनी संसदेचं निर्माण करणाऱ्या कामगारांचा सत्कार केला. त्यानंतर सर्व धर्मीय प्रार्थनाही पार पाडली.