उदयपूर – राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्याकेड पुन्हा एकदा काँग्रेसचे नेतृत्व सोपवावे, अशी मागणी काँग्रेसच्या (Congress meeting) सगळ्या नेत्यांनी बोलावण्यात आलेल्या एका बैठकीत केल्याची माहिती आहे. या मागणीनंतर सोनिया गांधींनी (Sonia Gandhi)सर्व राज्यांतील प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, प्रभारी आणि विरोधी पक्षनेत्यांची बैठक शनिवारी बोलावली असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्या होणाऱ्या काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीतही याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळून देशभरात यात्रा काढायाला हवी, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. ही जनजागरण यात्रा सर्व राज्यांतून काढण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. या यात्रेच्या निमित्ताने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्व राज्यांत काँग्रेसचे वातावरण निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल.
ही यात्रा व्यवस्थित आणि प्रभावी व्हावी यासाठी त्याचा एक रोडमॅप तयार करण्याची गरज व्यक्त करण्यात आलीये. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी ऑगस्टमध्ये निवडणूक होणार आहे. राहुल गांधी हेच पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होतील, असे मानण्यात येते आहे. त्यानंतर ऑक्टोबरपासून देशात जनजागरण यात्रा सुरु होईल, अशी शक्यता आहे.
या चिंतन शिबिरात पुन्हा राहुल यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात येतील, हा कयास प्रत्यक्षात उतरताना दिसतो आहे. उ. भारतात काँग्रेसचा कमी झालेला प्रभाव भरुन काढण्यासाठी यात्रा परिणामकारक ठरेल असे सांगण्यात येते आहे. पार्टीचे नेते आणि कार्यकर्त्यांत पुन्हा उत्साह निर्माण करण्यासाठी ही यात्रा गरजेची असल्याचे मानण्यात येते आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला उ. प्रदेश, पंजाब, दिल्ली, प. बंगाल, गोवा यासह अनेक राज्यांत काँग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
सर्व नेत्यांनी आपले म्हणणे मांडले असले तरी सोनिया गांधीनी याबाबत आपले मत व्यक्त केलेले नाही. अशा एका मोठ्या यात्रेचे नियोजन व्हायला हवे, ज्यातून प्रत्येक राज्यातील मोठ्या जिल्ह्यांपर्यंत काँग्रेस पोहचेल, अशी नेत्यांची इच्छा आहे. राहुल यांना यानिमित्ताने राज्यातील नेत्यांसह जिल्हा पातळीवर ने्त्यांशीही संवाद करता येईल आणि नेमके वातावरण कळेल. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेही सातत्याने देशात प्रवास करीत आहेत, त्याचप्रमाणे काँग्रेसच्या नेतृत्वाने २०२४ साठी करायला हवे असे कार्यकर्ते सांगतायेत.
रणनीतीकार प्रशांत किशोर यांची सोनिया गांधींशी जी चर्चा झाली, त्यातही या जनजागरण यात्रेचा मुख्य उल्लेख होता. त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा होता. काँग्रेसनेही ही यात्रा गाँभिर्याने घेतली आहे. या चिंतन शिबिरानंतर काँग्रेसमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.