असं काय झालं की राहुल गांधी यांनी स्वत:लाच चाबकाचे फटके मारून घेतले; भारत जोडो यात्रेत चाललंय काय?
भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणात आहे. राज्यातील 19 विधानसभा मतदारसंघ आणि 7 लोकसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे.
हैदराबाद: काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) सुरू आहे. ही यात्रा हैदराबादेत पोहोचली आहे. सध्या या यात्रेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राहुल गांधी स्वत:ला चाबकाचे फटके मारताना दिसत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तेलंगणात सध्या बोनालू हा पारंपारिक उत्सव सुरू आहे. या उत्सवात सहभागी होऊन राहुल गांधी यांनी स्वत:वर आसूडाचे फटके (Whips) मारले. त्याचाच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
Pothuraju లా మన జగ్గన్న మరియు మన రాహుల్ గాంధీ గారు. #BharatJodoYatra pic.twitter.com/KE1D6ZmG9P
— Mohd Ishaq Mujahid (@INCIshaqMujahid) November 3, 2022
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा 57 वा दिवस आहे. राहुल गांधी यांची ही यात्रा तेलंगणात आली. राज्यात सध्या बोनालू उत्सव सुरू आहे. इथे आल्यावर राहुल गांधी यांनी पोतराजांची भेट घेतली. हे पोतराज अंगावर आसूडाने फटके मारत होते.
राहुल गांधी यांनीही पोतराजांकडून आसूड घेतला आणि अंगावर सपासप फटके मारण्यास सुरुवात केली. हजारो लोकांसमोर त्यांनी अंगावर चाबकाचे फटके मारले. सर्वसामान्यांमध्ये मिसळलेल्या राहुल गांधी यांचं हे कृत्य पाहून येथे उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांनी जोरदार जल्लोष केला.
बोनालू उत्सवात हे पोतराज भाग घेत असतात. ते या उत्सवाचं प्रमुख आकर्षण असतात. या पोतराजांना देवी महाकालीचा भाऊ मानलं जातं. ते देवीच्या रक्षणासाठी हातात आसूड घेऊन फिरतात.
या उत्सवात पोतराज बनलेले युवक पुढे पुढे चालतात. त्यांच्यामागे महिला येत असतात. अशा प्रकारे हे लोक पायी चालत देवीच्या मंदिरात येतात. ही पायी पदयात्रा करताना हे पोतराज अंगावर कोडे मारत मारतच देवीच्या मंदिरापर्यंत येत असतात. ही गेल्या अनेक वर्षांपासूनची इथली परंपरा आहे.
भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणात आहे. राज्यातील 19 विधानसभा मतदारसंघ आणि 7 लोकसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरू असून त्यांनी आतापर्यंत 375 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.
राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरुवात झाली. काश्मीरला या यात्रेचा शेवट होणार आहे. एकूण 3570 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा काश्मीरला पोहोचणार आहे.