लोकसभेत राहुल गांधी यांना मिळणार मोठी जबाबदारी, काँग्रेस नेत्यांची मागणी काय?
लोकसभा निवडणुकीत गेल्या १० वर्षानंतर काँग्रेसला चांगलं यश मिळालं आहे. त्यांना ९९ जागा मिळाल्या आहेत. राहुल गांधी यांनी या निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व केले होते. इंडिया आघाडीत त्यांचं नाव चर्चेत राहिलं. दोन ठिकाणाहून निवडून आलेल्या राहुल गांधी यांना लोकसभेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून एनडीएला बहुमत मिळाले आहे. भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे आता ते इतर मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनडीएचा नेता घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रपतींनी ७ जूनचा वेळ दिल्याची माहिती आहे. त्यामुळे ७ जून रोजी एनडीए सरकार स्थापनेचा दावा करणार असून ९ जून रोजी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. लोकसभेत लोकांनी आपले प्रतिनिधी निवडले आहेत. विरोधी पक्षाला यंदा चांगल्या जागा मिळाल्याने ते देखील उत्साहित आहेत.
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभेत मोठी जबाबदारी मिळू शकतो. त्यांना विरोधी पक्षनेते पद दिले जाऊ शकते. त्यांनी विरोधीपक्ष नेते व्हावे, अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने गेल्या 10 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यंदा काँग्रेसला लोकसभेत 99 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला जास्त जागा मिळाल्याने संसदेत विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करु शकते. या प्रतिष्ठेच्या पदावर राहुल गांधी यांना बसवण्यासाठी आवाज बुलंद होऊ लागला आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार मणिकम टागोर यांनीही या संदर्भात X वर एक पोस्ट लिहिली आहे.
काँग्रेसच्या खासदारांची मागणी
मणिकम टागोर यांनी राहुल गांधी यांना संसदेच्या कनिष्ठ सभागृहात काँग्रेसचे नेते बनण्याचे आवाहन केलेय. मणिकम टागोर हे तामिळनाडूतील विरुधुनगरमधून विजयी झाले आहेत. ते म्हणतात की, ‘मी माझे नेते राहुल गांधी यांच्या नावाने मते मागितली. ते लोकसभेतील काँग्रेसचे नेते असावेत, असे मला वाटते. मला आशा आहे की काँग्रेसचे निवडून आलेले खासदारही असाच विचार करतील.
काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तनखा यांनी म्हटले की, ‘या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व राहुल गांधींनी केले होते. ते पक्षाचा चेहरा होते. लोकसभा संसदीय पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. राहुल गांधी सर्व निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत. काही निर्णय पक्षाच्या नेत्यांना/खासदारांना घ्यावे लागतात. निश्चितपणे सर्वानुमते निर्णय घेतला जाईल.
काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम म्हणाले, ‘मला वाटते की हे पद काँग्रेसकडे जाईल. माझ्या वैयक्तिक मतानुसार, राहुल गांधींनी स्वतः काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
संजय राऊत यांचा ही राहुल यांना पाठिंबा
संजय राऊत म्हणाले की, ‘राहुल गांधी नेतृत्व स्वीकारण्यास तयार असतील तर आमचा आक्षेप का? राष्ट्रीय नेता म्हणून त्यांनी अनेकवेळा सिद्ध केले आहे. ते लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. आपल्या सर्वांना ते हवे आहेत आणि आवडतात. युतीबाबत कोणताही आक्षेप किंवा मतभेद नाही.