Indian Railways: डिझेल इंजिन रिटायर, 20 कोटींच्या इंजिनाची एक-एक कोटीत भंगारात विक्री
Indian Railways: डिझेल इंजिनच्या विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा काढण्यात आली. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळला बोलवण्यात आले. परंतु या देशांनीही डिझेल इंजिन खरेदीत रस दाखवला नाही. त्यामुळे शेवटी डिझेल इंजिनाची विक्री रेल्वेला भंगारात करावी लागली.
Indian Railways: ‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत गाडी’ हे गाणे ऐकून आणि वाफेचे इंजिन पाहणारी पिढी आता साठीत आहे. त्या पिढीने कोळसा इंजिनापासून वंदे भारतच्या सेमी हायस्पीडपर्यंत रेल्वे इंजिनाचा प्रवास पाहिला आहे. त्या पिढीने वाफेचे इंजिन इतिहास जमा होताना पहिले आहे. भारतीय रेल्वेने १९९७ मध्येच वाफेचे इंजिन निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. वाफेच्या इंजिनांचा वापर पूर्णपणे बंद केला. कोळसा जाळून वाफ निर्माण करणाऱ्या इंजिनाची जागा डिझेल इंजिनाने घेतली. आता डिझेल इंजिन इतिहास जमा होऊ लागले आहेत. वाफेच्या इंजिनांच्या तुलनेत डिझेल इंजिने अधिक कार्यक्षम होती. त्यांची देखभाल कमी करावी लागत होती. परंतु आता आणखी नवीन तंत्रज्ञान आले. यामुळे रेल्वे सर्व डिझेल इंजिन निवृत्त केले जात आहे. त्याची जागा इलेक्ट्रीक इंजिन घेत आहेत. नुकतेच पश्चिम मध्ये रेल्वेने त्यांच्याकडे असलेली सर्व डिझेल इंजिन विक्रीसाठी भंगारात काढले आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात आली. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने भंगारात डिझेल इंजिनाची विक्री होत आहे.
असे आले डिझेल इंजिन भारतात
भारतात १८५३ मध्ये पहिली रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते ठाणे दरम्यान धावली. त्यानंतर वाफेच्या इंजिनापासून वंदे भारतच्या सेमी हायस्पीड इंजिनापर्यंत रेल्वे इंजिनाने प्रगती केली. १९४० च्या दशकात अमेरिकेमध्ये डिझेल इंजिनांचा वापर सुरू झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर जगभर डिझेल इंजिने वापरात आली. त्यावेळी भारतात वाफेचे इंजिन होते. ते अगदी धिम्या गतीने धावत होते. अमेरिकेतील डिझेल इंजिन १२० किलोमीटरच्या वेगाने धावत होते. त्यामुळे हे तंत्रज्ञान भारतात आणण्याचा विचार सुरु झाला. त्यासाठी अल्को लोको या कंपनीशी चर्चा सुरु झाली. त्यांनी भारतीय रेल्वेला डिझेल इंजिनाचे तंत्रज्ञान देण्यास होकार दिला. त्यानंतर उत्तर प्रदेशात १९६१ मध्ये डिझेल-विद्युत रेल्वे इंजिन निर्मितीसाठी पहिला रेल्वे इंजिन कारखान्याची निर्मिती झाली. वाराणसीमध्ये पहिला डिझेल इंजिन कारखाना सुरु झाला.
२०१९ पासून डिझेल इंजिनाची निर्मिती बंद
जानेवारी १९६४ मध्ये पहिले रेल्वे इंजिन राष्ट्राला समर्पित करण्यात आले. मार्च २०१९ पासून डिझेल इंजिनाची निर्मिती बंद झाली. आता फक्त इलेक्ट्रीक इंजिन बनवण्यात येते. पश्चिम मध्ये रेल्वेने सर्व डिझेल लोको इंजिन आता निवृत्त केले आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या इतिहासात ५२ वर्षानंतर डिझेल इंजिनाचा प्रवास थांबला आहे. आता त्याची जागा इलेक्ट्रीक इंजिनाने घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय निविदा पण प्रतिसाद नाही
पश्चिम मध्य रेल्वेचे पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे. यामुळे रेल्वेने ८० पेक्षा जास्त डिझेल इंजिन विक्रीसाठी निविदा काढली आहे. ही निविदा आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा काढण्यात आली. भारताच्या शेजारी देश ही डिझेल इंजिन घेतील, अशी अपेक्षा रेल्वेला होती. त्यामुळे श्रीलंका, बांगलादेश, नेपाळला बोलवण्यात आले. परंतु या देशांनीही डिझेल इंजिन खरेदीत रस दाखवला नाही. त्यामुळे शेवटी डिझेल इंजिनाची विक्री रेल्वेला भंगारात करावी लागली. जबलपूरमध्ये असलेले डिझेल इंजिन खरेदीसाठी जवळपासच्या राज्यातून भंगारवाले पोहचले आहेत. त्यातील काही इंजिन विकत घेऊन त्यांची तुकडे केले जात आहेत.
२० कोटींच्या इंजिनाची विक्री एका कोटीत
डिझेल इंजिनाचे वजन ९६ हजार किलो आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी नेऊन त्याचे तुकडे करणे त्यानंतर पुन्हा त्याची वाहतूक करणे अवघड आणि खर्चिक गोष्टी आहे. यामुळे रेल्वे ट्रॅकवरच डिझेल इंजिनाचे वेगवेगळे भाग केले जात आहे. डिझेल इंजिन कापण्यासाठी झारखंडवरुन विशेष टीम जबलपूरमध्ये आली. गॅस कटरने डिझेल इंजिन कापले जात आहेत. २० कोटींत विकत घेतलेले हे इंजिन एका कोटीत भंगारात विकले जात आहे.
डिझेल इंजिनपेक्षा इलेक्ट्रीक इंजिन स्वस्त
१२ डब्बे असलेली रेल्वेसाठी एक डिझेल इंजिन सहा लिटर डिझेलमध्ये एक किलोमीटरचा प्रवास करतो. त्या तुलनेत इलेक्ट्रीक इंजिनचा खर्च कमी आहे. २५० किलोमीटर जाण्यासाठी इलेक्ट्रीक इंजिनाला ५ हजार मेगा वॅट वीज लागते. तसेच त्यामुळे प्रदूषणही होत नाही. पर्यावरणाचे संवर्धन होते. २०१९ मध्ये रेल्वेने ३१ वर्षांपेक्षा जास्त जुने असलेले ३०० डिझेल इंजिन निवृत्त केले होते. डिझेल इंजिनाचे सरासरी वय ३० वर्ष असते. ओवरहॉलिंग केल्यानंतर त्यांचे वय पाच ते सहा वर्षांनी पुन्हा वाढते.
भारतीय रेल्वेचा असाही प्रयोग
भारतीय रेल्वेने डिझेल इंजिनाचे रुपातंर इलेक्ट्रीक इंजिनात करण्याचा कारनामाही केला आहे. २६०० ते २७०० हॉर्स पॉवर क्षमता असलेले डिझेल इंजिन ५ हजार ते १० हजार हार्स पॉवर असलेल्या इलेक्ट्रीक इंजिनात बदलले जात आहे. २२ डिसेंबर २०१७ रोजी सुरु केलेले हे काम २८ फेब्रुवारी २०१८ रोजी पूर्ण झाले होते. रेल्वेने ६९ दिवसांत डिझेल इंजिन इलेक्ट्रीक इंजिनात बदलले होते.
डिझेलपेक्षा इलेक्ट्रीक इंजिन का असतात हलकी
डिझेल इंजिन इलेक्ट्रिक इंजिनपेक्षा खूप जड असतात. इलेक्ट्रिक इंजिनमध्ये त्यापेक्षा अनेक कमी नवीन घटक असतात. इलेक्ट्रिक इंजिनला ओव्हर हेड उपकरणातून वीज मिळते. डिझेल इंजिनच्या तुलनेत इलेक्ट्रिक इंजिन प्रत्यक्षात ओएचईकडून वीज घेते. त्याचे रुपातंर करुन ते वापरण्यायोग्य बनवते. डिझेल इंजिन डिझेलच्या मदतीने इंजिनमध्ये वीज तयार करते आणि वापरते. यामुळे, डिझेल इंजिनमध्ये अधिक घटक असतात. यामुळे इलेक्ट्रिक इंजिन डिझेल इंजिनपेक्षा हलकी असतात.
भारतीय रेल्वेचे लवकरच शंभर टक्के विद्युतीकरण होणार आहे. रेल्वेच्या ६६,३४३ किलोमीटरमार्गापैकी आता २,१९९ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण राहिले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे. सन २०२३-२४ मध्ये ७,१८८ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण करण्याचा विक्रम भारतीय रेल्वेने केले आहे. लवकरच आता शंभर टक्के विद्युतीकरण होणार आहे. यामुळे रेल्वेच्या सर्व विभागातून डिझेल इंजिन निवृत्त होणार आहे. डिझेल इंजिनाचा प्रवास इतिहासजमा होणार आहे.