Monsoon : कुठे पावसाची ओढ तर कुठे दाणादाण, खरिपाला दिलासा अन् पाणीपातळीतही वाढ, विदर्भ-मराठवाड्यातही दणक्यात पाऊस
नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पावसाने हाहाकार केला असून ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, अगोदरच पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांना आता तिबार पेरणीचे संकट उभं राहिलंय. शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत.
मुंबई : जून महिन्यात (Monsoon) मान्सूनच्या लहरीपणाचे दर्शन झाले असले तरी जुलैच्या पहिल्या दिवसापासून चित्र बदलले आहे. आतापर्यंत केवळ कोकण आणि मुंबईसह उपनगरातच पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे (Kharif Season) खरिपासह पिण्याच्या पाण्याचे काय होणार याची धास्ती प्रत्येकालाच होती पण आता परस्थिती बदलली आहे. राज्यात मान्सून सक्रीय झाला असून दमदार पावसाने खरिपाचा टक्का तर वाढला आहेच पण (Increase water level) पाणीपातळीतही वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर मराठवाड्यातील बीड, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मात्र, खरिपातील पेरणीला हा पाऊस पोषक असल्याने देर आऐ..दुरुस्त आऐ..असेच शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे 15 जुलैपर्यंत राज्यातील सरासरी क्षेत्रावर पेरण्या होतील असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
नांदेडमध्ये तिबार पेरणाीचे संकट
नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पावसाने हाहाकार केला असून ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, अगोदरच पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांना आता तिबार पेरणीचे संकट उभं राहिलंय. शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पाण्यामुळे पिकासह शेतीही खरडून गेलीय. अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरलं आहे, तर तालुक्यातील शेलगाव , शेणी, कोंढा, देळूब सह अनेक गावांचा संपर्क सकाळ पर्यंत तुटलेला आहे.
हिंगोलीत गावाचा संपर्कच तुटला
वसमत तालुक्यातील कुपटी गावलगतच्या पुलाचे संबधीत विभागाने एन पावसाळ्यात काम सुरू केल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ,रात्री झालेल्या मुसळधार पावसा मुळे पर्यायी रस्ता वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे शालेय विद्यार्थी, दूधवाले,कर्मचारी गावातच अडकून पडले आहेत. आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात पावसाअभावी रखडलेल्या खरिपातील पेरण्यांना गती मिळणार आहे.
जळगावातही कोसळधारा
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात रात्री मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. शहारत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. पाचोरा शहरातील मुख्य रस्त्यावरील भुयारी पुलात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने शहराचा काही भागाकडील संपर्क तुटला होता. तर इतरही पुलावरून पाणी गेल्यामुळे अनेक नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याची प्राथमिक माहिती आहे.
रत्नागिरीमध्ये पावसाची बॅटींग सुरुच
हंगामाच्या सुरवातीपासूनच कोकणावर वरुणराजाची कृपादृष्टी राहिलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जूनपासून 8 जुलैपर्यंत 1300 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. तर 12 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी आपले पात्र सोडले आहे. खेड जगबुडी तर राजापूरची कोदावली नदीनेही पात्र सोडले आहे. मुसळधार पावसाबरोबरच सातत्य असल्याने ही स्थिती ओढावली आहे. शिवाय अजून चार दिवस अशीच स्थिती राहणार आहे.
हिंगोलीमध्ये गावनद्यांना पूर, पावसाचे पाणी घरात
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पावसाची कृपादृष्टी झाली आहे. असना नदीचे पाणी किन्होळा गावात घुसले आहे. गावातील मारोती मंदिर, जिल्हा परिषद शाळा ही पाण्याखाली आहे तर नागरिकांच्या घरातही पाणी शिरेल आहे. जलेश्वर नदीचे पाणी हे करुंदा गावात घुसले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे.
जळगावात हतनुर धरणाचे 8 दरवाजे उघडले
जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे 8 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून हतनुर धरणातून तापी नदी पात्रात विसर्ग 8193 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हातनुर भागात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने हतनुर धरणाचे 8 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे .
बीडकरांना मात्र पावसाची प्रतिक्षा
मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, बीड आणि लातूर जिल्ह्यावर अजूनही वरुणराजाची अवकृपाच आहे. या दोन्ही जिल्ह्यामध्ये पाऊस हा सक्रीय झालेला नाही. शिवाय अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पेरणीबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आहे. 15 जुलैपर्यंत पावसाने हजेरी लावली तरच खरिपातील पेरण्या होणार आहेत. मात्र, आगामी दोन दिवसांमध्ये या जिल्ह्यातही पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे.