‘पद्मावत’, ‘जोधा-अकबर’ला विरोध करणाऱ्या करणी सेनेच्या संस्थापकाचा हृदयविकाराने मृत्यू; राजपूत समाजाचा कोहिनूर हरपला
करणी सेनेचे संस्थापक लोकेन्द्र सिंह कालवी यांचं निधन झालं आहे. त्यांनी 2006मध्ये करणी सेनेची स्थापना केली होती. देशातील एक आक्रमक संघटना म्हणून या संघटनेकडे पाहिलं जातं.
जयपूर : राजपूत समाजाचे कोहिनूर, श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेन्द्र सिंह कालवी यांचं सोमवारी रात्री जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात निधन झालं. कालवी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. लोकेन्द्र कालवी गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. जून 2022मध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. कालवी यांच्या पार्थिवावर नागौर जिल्ह्यातील कालवी या त्यांच्या गावी आज दुपारी सव्वा दोन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
काल रात्री 12.30 वाजता लोकेन्द्र सिंह कालवी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचं निधन झालं. कालवी हे राजपूत समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते. राजपूत समाजाचा कोहिनूर म्हणूनही त्यांना ओळखलं जायचं. त्यांच्या निधनामुळे या समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कालवी यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर रात्रीच त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. लोकेन्द्र सिंह कालवी यांचे वडील कल्याण सिंह कालवी हे राजस्थान सरकारमध्ये मंत्री होते. तसेच केंद्र सरकारमध्येही ते मंत्री होते. तसेच सती आंदोलनात कालवी सक्रिय होते. मी राजकारणी नंतर आधी राजपूत आहे, असं ते म्हणायचे. त्याच पद्धतीने लोकेन्द्र कालवी सुद्धा राजकारणात सक्रिय होते. कालवी यांचे भाजप, काँग्रेस आणि जनता दलातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते.
2006 मध्ये करणी सेनेची स्थापना
लोकेन्द्र सिंह कालवी यांनी जगतजननी करणी माता यांच्या नावाने 2006मध्ये करणी सेनेची स्थापना केली. 2008मध्ये करणी सेनेच्या विरोधामुळे ‘जोधा-अकबर’ हा सिनेमा राजस्थानात प्रदर्शित होऊ शकला नव्हता. करणी सेनेने 2009मध्ये सलमान खानच्या ‘वीर’ या सिनेमालाही विरोध केला होता. या सिनेमात राजपूतांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
‘पद्मावत’ला विरोध
करणी सेनेने टीव्हीवरील एका टीव्ही सीरियलचाही विरोध केला होता. 2018मध्ये आलेल्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ सिनेमालाही त्यांनी विरोध केला होता. ‘पद्मावत’ला विरोध केल्यानंतर करणी सेनेचं नाव संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं होतं. एक आक्रमक संघटना म्हणून करणी सेनेची ओळख प्रस्थापित झाली होती.