Ram mandir : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सचिन तेंडुलकरला आमंत्रण, हे सेलिब्रिटी राहणार उपस्थित
Ayodya ram mandir : अयोध्येत तयार झालेल्या राम मंदिरात २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरचा देखील समावेश आहे. सचिनसह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत.
Ayodhya Ram Mandir : भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरला 22 जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिरातील ‘प्राणप्रतिष्ठा’ समारंभास उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे. या सोहळ्याला सचिन तेंडुलकर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरु असून काम अंतिम टप्प्यात आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत देशभरात उत्साह दिसून येत आहे. देशभरातून 11 हजारांहून अधिक लोकांना आमंत्रण करण्यात आले आहे. अनेक सेलिब्रिटी देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना राममंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे. सुपरस्टार रजनीकांत, अनुपम खेर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, जॅकी श्रॉफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
७ हजार किलोचा प्रसाद
अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा पाहण्यासाठी देश-विदेशातील लोकं आतूर झाले आहेत. देशभरात याचा उत्साह पाहायला मिळत आहे. या दिवशी तब्बल ७ हजार किलोचा प्रसाद देखील बनवला जाणार आहे. प्रसाद बनवण्याची जबाबदारी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना देण्यात आली आहे.
रामजन्मभूमीची माती खास भेट म्हणून उपस्थित पाहुण्यांना दिली जाणार आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राकडून या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. मंदिर परिसरात कार्यक्रमासाठी 7,500 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
काही सेंकदाचा मुहुर्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मंदिरात रामललाच्या मूर्तीवर ‘अभिषेक केला जाणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 22 जानेवारीला हा कार्यक्रम ठेवला आहे. ज्यासाठी फक्त काही सेंकदाचा मुहूर्त असणार आहे. कार्यक्रमाच्या अगोदर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) आणि VHP स्वयंसेवकांपर्यत देशभरातील लोकांना अयोध्येतील अक्षत: पोहोचवल्या जात आहेत. या दिवशी लोकं मंदिरात किंवा आपल्या घरीच दिवाळी साजरी करणार आहेत.
अयोध्येत जोरदार तयारी
अयोध्येतील राम लल्ला विराजमान होणार असल्याने वैदिक विधी 16 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. 14 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत अयोध्येत अमृत महोत्सव साजरा होणार असून २३ जानेवारीपासून इतर लोकांना दर्शन घेता येणार आहे. हजारो लोकं येणार असल्याने यूपी सरकारकडून देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. लोकांच्या राहण्याची सोय करण्यात येत आहे. अयोध्या नगरीला सजवण्यात आलं आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तेनात करण्यात आला आहे.