Ram mandir : अमेरिकेतून रामलल्लासाठी आले खास सोन्याचे सिंहासन
Ram mandir : रामलल्लासाठी विश्रामाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. यासाठी ६ फूट लांब आणि चार फूट रुंद रजई आणण्यात आली आहे. सोबत एक गादी आणि उशी देखील आहे. पण यासोबतच प्रभू रामलल्लासाठी अमेरिकेतून खास सुवर्ण भेटही पाठवण्यात आली आहे.
Ram mandir : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर सगळ्यांसाठी खुले झाले आहे. दररोज लाखो लोकं दर्शनासाठी अयोध्येत येत आहे. देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात राम मंदिर देवस्थानला देणग्या येत आहेत. रामलल्लाचे दर्शन करुन भाविक भारावून जात आहेत. मंदिरात आता प्रभू श्रीरामाच्या निद्रावस्थेचीही व्यवस्था करण्यात येत आहे. भोपाळ येथून रामललासाठी उशी-रजई आणण्यात आली आहे. सर्व भाविक नाचत, गात रामजन्मभूमी संकुलात पोहोचले. या यात्रेत 100 हून अधिक लोक सहभागी झाले होते. या यात्रेसोबत आलेल्या संदीप सोनी यांनी सांगितले की, भगवान श्री राम लला यांच्यासाठी रजई आणण्यात आली आहे.
रामलल्लासाठी खास अमेरिकेतून भेट
रामलल्लासाठी आणलेल्या रजईची लांबी ६ फूट आणि रुंदी चार फूट असल्याचे त्यांनी सांगितले. सोबत एक गादी आणि उशी देखील आहे. रामललासाठी अमेरिकेतून खास भेट पाठवण्यात आलीये. यामध्ये सोन्यापासून बनवलेली अनेक वाहने पाठवण्यात आली असून त्यात गजवाहन ते गरुड वाहन यांचा समावेश आहे. रामललाचे सुवर्ण सिंहासनही पाठवण्यात आले आहे. यासोबतच कल्पवृक्षाचे सुवर्ण मॉडेल पाठवण्यात आले आहे.
२५ लाख भाविकांनी घेतले दर्शन
उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये भगवान श्री राम लाला यांच्या अभिषेकनंतर 11 दिवसात सुमारे 25 लाख भाविकांनी भगवान श्री रामाचे दर्शन घेतले आहे. यादरम्यान 11 कोटी रुपयांहून अधिक दान आले आहे. मंदिर ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, गेल्या 11 दिवसांत सुमारे 8 कोटी रुपये दानपेटीत जमा करण्यात आले आहेत, तर सुमारे 3.50 कोटी रुपये चेक आणि ऑनलाइनद्वारे प्राप्त झाले आहेत.
मंदिर परिसरात चार मोठ्या दानपेट्या
राम मंदिराच्या गर्भगृहासमोर एकूण चार दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये भाविक पैसे दान करत आहेत. याशिवाय १० काउंटरवर देखील देणगी जमा केली जात आहे. देणगी काउंटरवर मंदिर ट्रस्टकडून कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत. संध्याकाळी काउंटर बंद झाल्यानंतर मिळालेल्या देणगीची रक्कम ट्रस्टच्या कार्यालयात जमा करतात. त्यानंतर ती बँक कर्मचारी आणि ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ते मोजले जातात.